कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षण (SIR) कामामुळे आलेल्या मानसिक दबावातून मुर्शिदाबाद जिल्ह्यात एका BLO (Booth Level Officer) कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जाकिर हुसेन हक (वय ४८) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, ते खारग्राम येथील दिघा प्राथमिक शाळेत बीएलओचे काम करत होते. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, मागील गुरुवारपासून सर्व्हर व्यवस्थित काम करत नसल्यामुळे ते प्रचंड तणावाखाली होते. गुरुवारी रात्री त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून, कामाचा अधिक भार आणि दबाव त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये SIR चे काम सुरू असताना, या घटनेने ग्राउंड स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्थितीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यापूर्वीही कामाच्या तणावातून बीएलओ यांच्या मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत.