“शरद पवार जे सांगतील त्या पध्दतीने काम करू’; भाजप नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई : राज्यात अलिकडेच एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीचे घड्याळ हाताला बांधले होते. दरम्यान, काही दिवसांपासून भाजपाचे काही आमदार पक्षातून बाहेर पडणार असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यातच भाजपाचा आणखी एक नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.
नुकतेच भाजपाचे कल्याणराव काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर दिसले. विशेष म्हणजे आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करू, असेही काळे यावेळी म्हणाले. त्यामुळे काळे राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
भाजपा नेते कल्याणराव काळे आणि शरद पवार शुक्रवारी सरकोली येथे झालेल्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात कल्याणराव काळे यांनी केलेल्या भाषणाचीही जोरदार चर्चा रंगली आहे. “आपण यापुढे शरद पवार जे सांगतील, त्या पध्दतीने काम करू. शरद पवार यांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुराडे पेटले आहेत.
आमच्यापण काही चुका झाल्या, परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल, चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार आहे,” असे कल्याणराव काळे भाषणात म्हणाले.
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शरद पवार शुक्रवारी सकाळी सरकोली येथे गेले होते. या सर्व कार्यक्रमात कल्याणराव काळे यांची उपस्थिती पाहून अनेकांच्या उंचावल्या आहेत. कल्याणराव काळे यांनी २०१४ मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवून ६५ हजार मते मिळवली होती. ऐन लोकसभा निवडणुकीच्या आधी काळेंनी भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला माढ्यासारख्या बालेकिल्ल्यातच खिंडार पडले होते.





