मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक चकमक आणि मूळ शिवसेना कोणाची यावरून वाद निर्माण झाला आहे. याच प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्याअगोदरच आता शिंदे गटाने पुन्हा एकदा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे याना धक्का दिला आहे.
मूळ शिवसेना आम्हीच असल्याचा दावा दोन्ही पक्षाकडून सध्या सुरु आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले आहे. त्यातच १२ खासदारांनीही शिंदे गटाला पाठिंबा दर्शवल्याने त्यांचे बळ वाढले आहे. यादरम्यान शिवसेनेचा ताबा मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.
शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात, उद्धव ठाकरेंनी नियुक्त केलेल्या शिवसेनेच्या बहुसंख्य नेत्यांनी एकत्र येऊन नवीन कार्यकारिणी स्थापन केली असल्याचे सांगितले आहे. सोमवारी एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करत नवी राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली होती.
शिवसेना खासदारांचा एक गट सोमवारी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या ऑनलाइन बैठकीला उपस्थित होता. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधी बोलावण्यात आलेल्या या बैठकीत एकनाथ शिंदे यांची पक्षाचे ‘मुख्य नेते’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांना शिवसेना मुख्य नेते म्हणून घोषित करण्यात आले, तर दिपक केसरकर यांची प्रवक्ते म्हणून नेमणूक करण्यात आली. तसेच तानाजी सावंत, विजय नहाटा, यशवंत जाधव, गुलाबराव पाटील यांची शिवसेना उपनेते म्हणून तर शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नेतेपदी निवड करण्यात आली.