सिंदखेडराजा – समृद्धी महामार्गावरअपघातांचे सत्र सुरूच असून आज सकाळी ८ वाजता सिंदखेडराजा परिसरात भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत क्रूझर वाहनातील दोघांचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. यवतमाळ जिल्ह्यातील आसेगाव देवी येथील भाविक शिर्डी दर्शनासाठी निघाले असताना त्यांच्या चारचाकही वाहनाचा टायर फुटला. वाहन वेगात असल्याने ते सुरक्षा कठड्याला धडकून पलटी झाले. या अपघातानंतर मागून येणाऱ्या दुसऱ्या एका कारचे नियंत्रण सुटल्याने ती देखील क्रूझरवर आदळली. या अपघातात विद्याबाई साबळे (५५) आणि मोतीराम बोरकर (६०) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच भावना रमेश राऊत (३०), प्रतिभा वाघोडे (४५) आणि मीराबाई गोटफोडे (६५) हे गंभीर जखमी झाले. महामार्ग अॅम्बुलन्सच्या डॉ. यासीन शहा, वैभव बोराडे आणि चालक दिगंबर शिंदे यांच्या पथकाने जखमींना तातडीने जालना येथील रुग्णालयात हलविले. क्रूझरमधील संतोष साखरकर, कमलाबाई जाधव, सुशीला जाणार, मिराबाई राऊत, छायाबाई चव्हाण, प्रमिला घाटोले, भक्ती राऊत, रमेश राऊत, बेबीबाई येलोत यांना सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान, क्रेटा कारमधील प्रवासी सुदैवाने बचावले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.