पुणे – नवले ब्रिज परिसरात मध्यरात्री झालेल्या अपघातात एक Tata Altroz कार उलटून गंभीर स्वरूपाची हानी झाली. मात्र वाहनातील दोन्ही प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्री सुमारे 12:30 वाजता VRL बस स्टॉपजवळ महामार्ग व सर्व्हिस रोडच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरवर कार जोरात आदळली. धडक एवढी जबरदस्त होती की कार उलटून सर्व्हिस रोडवर जाऊन पडली. अपघातानंतर वाहन चालक व त्याचा सोबती हे स्वतः कारमधून बाहेर पडले. दोघांनाही कोणतीही दुखापत झालेली नाही, हे मोठे दिलासादायक ठरले. घटनास्थळी स्थानिकांनी मदत करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या अपघाताची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.