रुग्णांची संख्या पोहोचली 265 वर; आनंदनगर ठरतेय “हॉटस्पॉट’
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या आनंदनगर झोपडपट्टीसह चिखली, भोसरी, रहाटणी, काळेवाडी, दापोडीतील 11 जणांचे आज (शुक्रवारी) सायंकाळी रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, येरवड्यातील पण वायसीएमएचमध्ये दाखल असलेल्या एकाचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. तर, सकाळीच कुदळवाडी आणि बिजलीनगर येथील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे दिवसभरात 14 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर, नऊ रुग्ण आज करोनामुक्त झाले आहेत.
पिंपरी महापालिकेने गुरुवारी करोना संशयितांचे रिपोर्ट तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्यातील काही रिपोर्ट शुक्रवारी सकाळी व काहीजणांचे सायंकाळी आले आहेत. त्यात हॉटस्पॉट आनंदनगरसह चिखली, भोसरी, रहाटणी, काळेवाडी, दापोडीतील 11 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. पाच महिला आणि सहा पुरुषांना करोनाची लागण झाली आहे. तर, चऱ्होली, यमुनानगर, भोसरी, सांगवी आणि पुण्यातील नाना पेठेतील रहिवासी असे 9 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 78 झाली आहे. तर, आजच्या बाधितांमुळे करोना रुग्णंची संख्या 265 वर पोहोचली आहे. आजपर्यंत 160 जण करोनामुक्त झाले आहेत. शहरातील आणि शहराबाहेरील मिळून 98 जणांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज दिवसभरात पुन्हा 141 संशयितांची भर पडली असून आजच्या रुग्णांसह एकूण 376 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. आतापर्यंत करोनामुळे एकूण 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
नक्की “करोना’रुग्ण किती
एकीकडे महापालिका आपल्या सायंकाळच्या प्रेसनोटमध्ये दिवसभरात 12 रुग्णांना “करोना’ची लागण झाल्याचे आणि एकूण “करोनाबाधितां’चा आकडा 265 झाल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे महापालिकेचाच कोविड डॅशबोर्ड दिवसभरात 21 रुग्णांना “करोना’ची लागण झाल्याचे म्हणत आहे. “डॅशबोर्ड’नुसार एकूण रुग्णसंख्या 274 इतकी झाली आहे. तसेच पालिकेच्या प्रेसनोटमध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या 78 आहे तर “डॅशबोर्ड’मध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या तब्बल 106 दाखवत आहे. यामुळे शहरात नक्की “करोना’चे रुग्ण किती असा संभ्रम निर्माण झाला आहे.