पब्जीसह आणखी 118 ऍपवर बंदी

नवी दिल्ली – चीनने सरहद्दीवर आणखी कुरापती वाढविल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बुधवारी आणखी 118 मोबाईल ऍपवर बंदी जारी केली आहे. यामध्ये तरुण वर्गात अतिशय लोकप्रिय असलेल्या पब्जी ऍपचा समावेश आहे.
या ऍपचा भारताच्या सार्वभौमत्वावर, एकात्मतेवर आणि संरक्षण व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे या ऍपवर बंदी घालण्यात आली असल्याचे केंद्र सरकारने जारी केलेल्या या माहितीत म्हटले आहे. त्याचबरोबर ही ऍप वापरणाऱ्या ग्राहकांची खासगी माहिती दूषित हेतूने संकलित केली जाते आणि या माहितीचा दुरुपयोग केला जातो असे समजले जाते. याच कारणामुळे केंद्र सरकारने 1 महिन्यापूर्वी चीनशी संबंधित 59 ऍपवर बंदी घातली होती. त्यामध्ये तरुण वर्गात लोकप्रिय असलेल्या टिक टॉक आणि यूसी ब्राउजरचा समावेश होता.
सरकारने याबद्दल जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाकडे विविध गटाकडून या संदर्भात तक्रारी येत होत्या. ऍपमधील माहितीची साठवणूक भारताबाहेर केली जाते. ग्राहकांची ही माहिती अनेक वेळा अयोग्य कामाकरिता वापरली जाते. यासाठी बऱ्याच ग्राहकांनी माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाकडे तक्रारी केल्या होत्या. भारतीय ग्राहकांच्या या माहितीचा दुरुपयोग झाल्यास त्याचा भारतीय एकात्मतेवर आणि सार्वभौमत्वावर परिणाम होऊ शकतो. यासाठी तातडीने अशा ऍपवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणत्या ऍपवर बंदी
आज ज्या ऍपवर बंदी घातली आहे, त्यामध्ये पब्जीशिवाय बैदूू, कॅमकार्ड, कट कट, राईज ऑफ किंगडम, झॅक झॅक, बैदूू एक्सप्रेस, टॅन्सेट वॉचलिस्ट, फेस यू, वुई चॅट रीडिंग, टॅन्सेंट वेयूॅ या ऍपचा समावेश आहे. त्याचबरोबर पब्जी लाईटवरही बंदी घालण्यात आली आहे. भारताच्या सार्वभौमत्त्वाच्या दृष्टीकोनातून आगामी काळातही अशा प्रकारची कार्यवाही करण्याची शक्यता सरकारने खुली ठेवली आहे.





