कोयना धरणातून उद्या आणखी १० हजार क्युसेक पाणी सोडणार; आजूबाजूच्या गावांना देण्यात आला सतर्कतेचा इशारा

कोयनानगर ( वार्ताहर) : कोयना धरणाच्या सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून उद्या दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता आणखी १०,००० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. येव्यानुसार त्यामध्ये वाढ करणेत येणार आहे. धरण पायथा विद्युत गृहामधील २१०० क्युसेक विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ५२,१०० क्युसेक् असेल.
त्यामुळे कोयना व कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. आज दि. १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता धरणामध्ये एकूण ८६.१९ टीएमसी म्हणजे ८१.८४ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.
भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी व रविवारी अति मुसळधार पावसाची (रेड अलर्ट) शक्यता वर्तविली आहे. या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त येव्याचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढविण्यात येत आहे. सद्यस्थितीत सांडव्यावरून ४०,००० क्यूसेक विसर्ग सुरू आहे.




