संतापजनक प्रकार! मराठवाड्यातील ‘या’ गावात तब्बल 216 जिवंत लोकांची नावं करोना मृतांच्या यादीत

मुंबई : करोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपयांची मदत सरकारकडून देण्यात येणार आहे. ही मदत देण्यासाठी शासनाकडून मृत व्यक्तींच्या नावाची खातरजमा करण्यात येत आहे. यातूनच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंबाजोगाई शहरात चक्क 216 जिवंत माणसांचा मृत व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर एकच संताप व्यक्त केला जात आहे.
यापूर्वीच अनेक करोना मृतांची नाव शासनाच्या पोर्टलला नोंदवण्यात आली नसल्याचे उघड झाले होते. आता मात्र जिवंत व्यक्तीचे नाव नोंदवले गेल्याने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
करोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान म्हणून 50 हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर कागदपत्रांची जमवाजमव करायचे काम शासन स्तरावर सुरू आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची माहिती हे आरोग्य विभागांतर्गत असलेल्या पोर्टलवर उपलब्ध आहे.
मात्र याच पोर्टलवर असलेल्या मृत व्यक्तींच्या संख्येपेक्षा जास्त नावे ही महसूल विभागाच्या हातात पडलेल्या यादीत आहेत. त्याचं झालं असं की अंबाजोगाई तहसीलदारांकडे कोरोनामुळे मृत झालेल्या 532 व्यक्तींच्या नावाची यादी आली आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांनी या नावाची खातरजमा करण्यासाठी या मृत व्यक्तींच्या घरी चौकशी केली.
नागनाथ वारद यांच्याकडे कर्मचाऱ्याने जाऊन तुमच्या घरातील व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झालाय, त्यांची माहिती द्या असे सांगितले. संतापजनक बाब ही होती की नागनाथ वारद यांच्याकडेच या कर्मचाऱ्याने त्यांच्याच मृत्यूची खातरजमा करण्यासाठी चौकशी केली, त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला.
अंबाजोगाईच्या आरोग्य विभागाकडे असलेल्या यादीमध्ये एकूण मृत व्यक्तींच्या नावाची नोंद ही 316 इतकी आहे. मात्र तहसीलदारांच्या हाती लागलेल्या यादीमध्ये मात्र एकूण 532 नावे आहेत. त्यामुळे ही वाढलेली 216 नावे आली कुठून आणि असा प्रश्न मात्र आता समोर आला आहे.





