राहाता -तालुक्यातील पंचायत समितीच्या दहा गणांची आरक्षण सोडत सोमवारी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी माणिक आहेर व तहसीलदार अमोल मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली. आरक्षणाच्या सोडतीनंतर आपल्या गणाकरिता अपेक्षित आरक्षण न पडल्याने पंचायत समिती सदस्य पदाकरिता इच्छुक असणाऱ्या अनेक भावी सदस्यांचा हिरमोड झाला आहे. जिल्हा परिषद गटांची सोडत ही जिल्ह्याच्या ठिकाणी तर पंचायत समिती गणांची सोडत तालुक्याच्या ठिकाणी काढण्यात आली. राहाता तालुक्यातील पंचायत समितीच्या 10 गणांची आरक्षण सोडत तहसील कार्यालय येथे काढण्यात आली. आरक्षण सोडतीचा विचार केला तर पंचायत समितीच्या 10 गणांपैकी पाच ठिकाणी महिला संवर्गाचे सदस्य पदासाठीआरक्षण निघाले आहे. गणनिहाय आरक्षण सोडतीचा विचार केला तर सावळीविहीर बुद्रुक, साकुरी, लोहगाव या तीन गणांमध्ये इच्छुक असणाऱ्या सर्वसाधारण प्रवर्गातील अनेक उमेदवारांचे या निवडणुकीत पंचायत समिती सदस्य बनण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. राखीव संवर्गातील अनेक उमेदवारांची अनपेक्षितपणे या ठिकाणी सदस्यपदी विराजमान होण्याची लॉटरी लागणार आहे. तालुक्यातील दहा गणांपैकी वाकडी, लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, पुणतांबा, दाढ बुद्रुक हे पाच गण सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी आरक्षित झाले आहे. लोहगाव व साकुरी अनुसूचित जातीकरिता, सावळीविहीर अनुसूचित जमाती आणि अस्तगाव व कोल्हार बुद्रुक गण नागरिकांचा मागास प्रवर्ग याप्रमाणे आरक्षित झाल्याने आता अनेक दिग्गजांची राजकीयदृष्ट्या मोठी फजिती झाली आहे. सावळीविहीर गण अनुसूचित जमाती महिला तर साकुरी गण अनुसूचित जाती महिला या संवर्गाकरिता राखीव झाल्याने खुल्या वर्गातील अनेक इच्छुक उमेदवारांची राजकीय स्वप्ने मावळली आहेत. पंचायत समितीची गणांची आरक्षण सोडत जरी झाली असली तरी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांचा ग्रीन सिग्नल ज्या उमेदवारांना मिळेल, त्यांचेच राजकीय भविष्य पंचायत समिती निवडणुकीत उदयास येईल, ही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता आरक्षण सोडतीनंतर तिकीट पदरात पाडून घेण्यासाठी भावी उमेदवार अर्थाची इच्छुक राजकीय फिल्डींग लावण्याच्या तयारीला लागले आहे. दहा गणांचे निघालेले आरक्षण सावळीविहीर बुद्रुक (अनुसूचित जमाती महिला), पुणतांबा (सर्वसाधारण महिला), वाकडी (सर्वसाधारण), लोहगाव (अनुसूचित जाती), अस्तगाव (नागरिकांचा मागास प्रवर्ग), साकुरी (अनुसूचित जाती महिला), लोणी बुद्रुक (सर्वसाधारण), लोणी खुर्द (सर्वसाधारण), दाढ बुद्रुक (सर्वसाधारण महिला), कोल्हार बुद्रुक (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला).