श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- प्रशासकीय दृष्ट्या गैरसोयीचा असलेल्या नगर जिल्ह्याचे विभाजन करून गुणवत्तेच्या आधारे श्रीरामपूर जिल्हा मुख्यालयाची येत्या 15 ऑगस्टपर्यंत घोषणा करा, अन्यथा पुढील काळात उग्र स्वरूपाचे आंदोलन करून प्रसंगी आगामी विधानसभा निवडणुकीवर शंभर टक्के बहिष्कार घालण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली तसेच सर्वपक्षीयांच्या वतीने श्रीरामपूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. येथील सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवसाय शंभर टक्के बंद ठेवले होते. दिवसभर कुणीही आपले व्यवसाय सुरू केले नाहीत. त्यामुळे श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय व्हावे, ही गेल्या 40 वर्षांपासूनची सर्वसामान्यांची तीव्र इच्छा असल्याचे या कडकडीत बंदने पुन्हा एकदा सिध्द झाले. माजी खा. सदाशिव लोखंडे यांनी श्रीरामपूर जिल्हा मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करू, असे मत त्यांनी व्यक्त केले. सुभाष त्रिभुवन यांनी दि. 15 ऑगस्टपर्यंत श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय झाले नाही तर मंत्रलयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला. शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमुख सचिन बडदे यांनी अनेक दिवसांपासून जिल्हा मुख्यालय प्रलंबित आहे. केवळ राजकीय इच्छशक्ती नसल्याने तिला मूर्त स्वरुप येत नाही. यासाठी प्रवरेपर्यंत दिंडी काढून महसूलमंत्री विखे पाटील यांच्याकडे मागणी करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नगर जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव शासन दरबारी गेल्या चाळीस वर्षांपासून प्रलंबित आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना प्रस्तावित जिल्हा मानूनच श्रीरामपूर येथे राबविण्यात येत आहेत. त्यात विभागीय पोस्ट कार्यालय, तार व पासपोर्ट कार्यालय आदींचा समावेश आहे. येथे प्रशासकीय दृष्ट्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. सर्वांसाठी सोयीचा आणि मध्यभागी असल्याने विभाजनानंतर श्रीरामपूर हेच ठिकाण जिल्ह्यासाठी योग्य आहे. तसेच गुणवत्तेच्या आधारे श्रीरामपूर या शहराचीच शिफारस जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त नाशिक यांनी राज्य सरकारकडे केलेली आहे. केवळ राजकीय इच्छाशक्ती आणि श्रेयवादामुळे हा प्रश्न गेले 40 वर्षे अडकून पडला आहे. त्यासाठी सातत्याने विविध अराजकीय संघटनांचे आंदोलने सुरू आहेत. आता आगामी विधानसभेच्या तोंडावर सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचविण्यासाठी पुन्हा हे आंदोलन सुरू झाले आहे. यावेळी गांधी चौकात आंदोलकांनी एकत्र येऊन श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी शिर्डीचे शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे, लकी सेठी, स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, मर्चंट असोसिएशन संजय कासलीवाल, संघटक अशोक उपाध्ये, संदीप मगर, कार्याध्यक्ष बाबासाहेब शिंदे, सचिव राजेंद्र सोनवणे, शिवसेनेचे अशोक थोरे, संजय छल्लारे, काँग्रेसचे अशोक कानडे, अरुण पा.नाईक, सचिन गुजर, प्रशांत लोखंडे, व्यापारी प्रतिनिधी राहुल मुथा, गौतम उपाध्ये यांच्यासह अनेकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. आंदोलनकर्त्यांच्या वतीने तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने जिल्हाप्रेमी नागरिक उपस्थित होते.