मुंबई – लॉकडाऊनमुळे हजारो स्थलांतरित मजूर ठिकठिकाणी अडकून पडले आहेत त्यांच्या संबंधात काय करायचे या विषयी केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली पाहिजेत, अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काल मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंवर केंद्रीय पथकाशी चर्चा केली त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. राज्यात सहा लाख स्थलांतरित मजुरांसाठी मदत केंद्रे उभारली असून त्यांची तेथे योग्य प्रकारे काळजी घेतली जात आहे असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, करोनाचा धोका वाढण्याची शक्यता वाढल्याने लॉकडाऊनची स्थिती वाढवावी लागली तर अडकलेल्या मुजरांना त्यांच्या घरी जाऊ दणे योग्य ठरेल जर तसे करावे लागले तर त्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे केंद्र सरकारने जाहीर करावीत. या मजुरांना परत पाठवताना त्यांच्यावर केंद्राने लक्ष ठेवावे आणि ते त्यांच्या मूळ गावी परतल्यानंतर त्यांना तेथे आवश्यकतेनुसार क्वारंटाईन करून ठेवावे. त्यामुळे त्यांच्या मार्फत करोना प्रसाराच्या धोक्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकेल. या संबंधात केंद्र सरकारने वेळीच निर्णय घेणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल या पथकाला सांगितले. राज्यातील 80 टक्के करोनाबाधित रुग्णांमध्ये त्या संबंधीची कोणतीच लक्षणे दिसून आलेली नाहीत याचे कारण काय असावे अशीही विचारणा त्यांनी केंद्रीय पथकाकडे केली. दुबईत यासंबंधी जे प्रभावी उपाययोजले गेले त्याचा अभ्यास करण्याची सूचनाही त्यांनी या पथकाला केली. केंद्राने जादा पीपीई किटस् आणि वैद्यकीय उपकरणांचा महाराष्ट्राला पुरवठा करावा अशी मागणीही त्यांनी या पथकाकडे केली. ज्यांच्याकडे रेशन कार्डे नाहीत त्यांनाही रेशनच्या धान्याचा लाभ देण्यासाठी केंद्राने या विषयींच्या नियमात शिथिलता दिली पाहिजे अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.