नगर । वंचितकडून आण्णासाहेब शेलार यांना उमेदवारी

बेलवंडी – श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याने बेलवंडी गावासह तालुक्यातील शेलार समर्थक आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला.
महायुतीकडून आमदार बबनराव पाचपुते यांच्या सौभाग्यवती प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर कऱण्यात आली. त्यातच काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेल्या अनुराधा नागवडे यांनी नुकताच वांगदरी येथे कार्यकर्ता मेळावा घेऊन अजित पवार यांच्या पक्षाला रामराम केला.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी आता फिल्डिंग लावली आहे. माजी आमदार राहूल जगताप हे देखील शरद पवार गटाकडून प्रबळ दावेदार मानले जात आहे. आण्णासाहेब शेलार यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन उमेदवारी विषयी चर्चा केली होती, त्यास सकारात्मक प्रतिसाद देत आंबेडकर यांनी अण्णासाहेब शेलार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. शेलार यांच्या उमेदवारीमुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे मात्र नक्की.





