Anna Hazare : पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणामुळे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे चित्र दिसत आहे. १८०० कोटी रुपयांचे बाजारभाव असलेली जमीन ३०० कोटी रुपयांना खरेदी करून यासाठी केवळ ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले, असा आरोप होत आहे. जमीन घोटाळाप्रकरणावरून पार्थ पवार यांच्यावर आरोपांची राळ उठवली जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत. बावधन पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पार्थ पवार यांची सही असलेला एक कागदपत्राचा फोटो फेसबुक पोस्ट करून शेअर करत पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होण्यापासून वाचवण्याचा मुंद्रांक विभाग आणि पोलिस प्रयत्न करत आहेत का? असा सवाल उपस्थित केला आहे. या प्रकरणावरून उबाठा गटाच्या नेते अंबादास दानवे यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काय म्हणाले अण्णा हजारे? आता या प्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एखाद्या मंत्र्याचा मुलगा चुकीचे वागत असेल तर तो मंत्र्याचा दोष आहे. त्यासाठी संस्कार हे महत्त्वाचे असतात. एखादा व्यक्ती घडण्यासाठी कुटुंबाचे संस्कार, घराण्याचे संस्कार, गावाचे संस्कार, समाजाचे संस्कार हे खूप महत्त्वाचे असतात, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी या प्रकरणावर दिली आहे. अशा प्रकरणात सरकारने कठोर पाऊले उचलत दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. प्रकरण काय? पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया या कंपनीने १८०० कोटींचे बाजाभाव असलेली जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहे. ही जमीन महार वतनाची आहे. महार वतनाच्या जमिनी या अहस्तांतरीत असतात. तरीही हा व्यवहार कसा झाला, असा प्रश्न विचारण्यात येत आहेत. या जमीन गैरव्यवहार प्रकरणी विरोधकांनी पार्थ पवार यांच्यावर आरोपांची राळ उठवली आहे. हेही वाचा : “तुमचं तुम्हाला तरी पटतंय का हे बोलताना?” उबाठाच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल, केली ‘ही’ मोठी मागणी