‘… म्हणूनच दिल्लीत केजरीवालांचा पराभव झाला’, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी सांगितले कारण

Delhi Election Results 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे कल समोर येत आहेत. समोर आलेल्या निकालाच्या कलानुसार आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कलांमध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत ‘आप’चा पराभव झाल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. यावर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अरविंद केजरीवाल यांचे विचार, चारित्र्य शुद्ध नाही म्हणूनच त्यांचा पराभव झाला, असे मत व्यक्त करत अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सध्या ‘आप’ पिछाडीवर आहे. या निकालावर बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, ‘मी नेहमीच म्हटले आहे की उमेदवाराचे आचरण, विचार शुद्ध असले पाहिजेत. जीवन दोषरहित असले पाहिजे आणि त्याग असावा. हे गुण मतदारांना उमेदवारावर विश्वास ठेवण्यास भाग पाडतात. मी हे अरविंद केजरीवाल यांना सांगितले पण त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही आणि शेवटी, त्यांनी दारूवर लक्ष केंद्रित केले. ते पैशाच्या ताकदीने भारावून गेले होते.’
VIDEO | Delhi Election Results 2025: On trends suggesting lead for BJP, social activist Anna Hazare says: “I have always said that a candidate’s conduct, thoughts should be pure, life should be without a blame, and sacrifice should be there… these qualities let voters have… pic.twitter.com/BGRq81XGIH
— Press Trust of India (@PTI_News) February 8, 2025
अरविंद केजरीवाल यांचे विचार, चारित्र्य शुद्ध नाही म्हणूनच त्यांचा पराभव झाला. त्यांचे जीवन निष्कलंक नव्हते. हे आमच्यासाठी काही करतील असा मतदारांचा विश्वास नव्हता, मी त्यांना वारंवार सांगितलं, मात्र त्यांनी ऐकलं नाही, असेही ते म्हणाले.
‘दिल्लीत दारूच्या ठेक्यांच्या माध्यमातून जो आर्थिक घोटाळा झाला त्यामुळे ते बदनाम झाले. एकीकडे ते लोकांच्या चारित्र्याबद्दल बोलतात. मात्र दुसरीकडे दारू ठेक्यांमध्ये घोटाळे करतात, असे लोकांना वाटू लागले.’
‘मी सुरुवातीपासून पक्ष काढण्यास विरोध केला होता. पक्ष आला की त्यात हौसे गवसे आणि नवसे सगळे येतात. त्यामुळे पक्ष बदनाम होतो. अरविंद केजरीवाल यांनी जनतेचा कौल मान्य केला पाहिजे’, असे अण्णा हजारे म्हणाले.




