प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 1 -अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याबाबत गुणात्मक दृष्टीने विचार व्हावा. त्यातून संशोधनाच्या वाटा शोधल्या जाव्यात, असे विचार कादंबरीकार विश्वास पाटील यांनी येथे मांडले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासानातर्फे विश्वास पाटील लिखित “अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान’ या कादंबरीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भारत सासणे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी लोकशाहीरांच्या “फकिरा’ कादंबरीच्या 52 व्या आवृत्तीचे प्रकाशक गुलाबराव कारले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, अध्यासन प्रमुख डॉ. सुनील भंडगे, डॉ. श्यामा घोणसे उपस्थित उपस्थित होते. पाटील म्हणाले, “अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याला महाराष्ट्रातील ग्रामीण साहित्य म्हणून गणले जाते. मात्र, प्रत्यक्ष त्यांच्या लिखाणाचा अभ्यास केल्यास त्यांचे साहित्य हे भारतीय साहित्य, महानगरीय साहित्य आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे योगदान मोठे असले, तरी त्यांचे स्थान मात्र आज जयंतीला हार घालण्यापुरते मर्यादित ठेवले आहे. मात्र आता तरी त्यांच्या समग्र वाङ्मयावर अभ्यास करणे गरजेचे अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचं दालन उभारू “अण्णा भाऊंचे साहित्य हे रोजच्या जगण्याशी निगडित होते. त्यांचे साहित्य दुर्लक्षित राहिल्याची खंत आहेच. पण, ही कमतरता विद्यापीठ स्तरावर आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करू. अण्णाभाऊंचे साहित्याचे दालन तसेच त्यांच्या साहित्याची व्हर्च्युअल गॅलरी उपलब्ध करून देऊ,’ अशी ग्वाही डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली.