Anjali Damania met Ajit Pawar : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सात आरोपींना अटक करून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करत विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवारांसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती दमानिया यांनी दिली. तसेच, या भेटीत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती त्यांनी दिली. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या एकत्र कंपन्यांचे काही कागदपत्रही अजित पवार यांच्याकडे दिल्याचे दमानिया यांनी सांगितले. उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेबाबत माहिती देताना दमानिया यांनी सांगितले की, मी अजित पवारांना काही पुरावे दाखवले. कशा पद्धतीने धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्र व्यवसाय असून, त्यांना कंपन्यामध्ये आर्थिक नफा कसा मिळतो? हे सांगितले. तसेच, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे, असे सांगितले. मी त्यांनी गृहमंत्रालयाने आमदार, मंत्र्यांना दिलेले निर्देश दाखवले. कायद्यानुसार कोणताही आमदार किवा मंत्री स्वत: किंवा घरच्यांसाठी आर्थिक नफा मिळवू शकत नाही. तरीही महाजनकोकडून यांना कसा नफा मिळत आहे याची कागदपत्रं दाखवले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. बीडमध्ये जी दहशत पसरवली आहे, त्याचे फोटो, रील्स मी त्यांना दाखवले. त्यांनी ते फोटो बघितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांची मंगळवारी दुपारी 12 वाजता बैठक आहे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे दमानिया यांनी सांगितले.