“महाराष्ट्रात एक नेपाळी आहे, त्याला वाटतंय की फक्त मीच हिंदू धर्म वाचवू शकतो” – अनिल परबांचा सभागृहात टोला, उद्धव ठाकरे हसले!

मुंबई: “हिंदू धर्म वाचवण्याची ताकद आमच्यात आहे, पण ते करताना दुसऱ्या धर्मावर अन्याय आम्ही करणार नाही, हीच आमची शिकवण आहे,” असं ठणकावून सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अनिल परब यांनी विधान परिषदेत जोरदार हल्लाबोल केला. नाव न घेता मंत्री नितेश राणे यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी म्हटलं, “महाराष्ट्रात एक नेपाळी आहे, त्याला वाटतंय की फक्त मीच हिंदू धर्म वाचवू शकतो!” या टोल्यावर उद्धव ठाकरे शेजारी बसून गालातल्या गालात हसले. परब यांनी राज्यात जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपही केला.
“तो नेपाळी शाल घेऊन फिरतोय, पण…”
अनिल परब म्हणाले, “आता काही लोक म्हणतात मांसाहार खायचा नाही. हा अधिकार त्यांना कोणी दिला? मटण कसं खायचं, झटका की हलाल, हे तुम्ही ठरवणार का? एक मंत्री सांगतो, काय खायचं आणि काय नाही. राज्यात हिंदू-मुस्लिम वाद निर्माण होईल असं वातावरण तयार केलं जातंय. माझ्या सोसायटीत एक नेपाळी वॉचमन आहे, तो रात्रभर ओरडतो आणि त्याला वाटतं आम्ही त्याच्यामुळे सुरक्षित आहोत. पण तसं नाही. असाच हा नेपाळी अंगावर शाल घेऊन फिरतोय आणि म्हणतोय, ‘मीच हिंदू धर्म वाचवेन.’ पण हिंदू धर्म वाचवायला आम्ही सक्षम आहोत!”
“बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, पण विटंबना नाही!”
परब पुढे म्हणाले, “घटनेने आपल्याला कसं जगायचं, काय बोलायचं हे स्वातंत्र्य दिलं आहे. पण म्हणून मी काहीही बोलू शकत नाही. सध्या कोणीही उठतंय, देवाची विटंबना करतंय, महापुरुषांचा अपमान करतंय. अशा गोष्टी थांबायला हव्यात.”
“निधीचं समान वाटप होत नाही”
“घटनेने निधीचं समान वाटप करण्याचा अधिकार दिलाय. पण केंद्र राज्याला निधी देताना दुजाभाव करते. आता राज्यातही असंच सुरू झालंय. माझ्या मतदारसंघात १०० कोटींच्या वर्क ऑर्डर मंजूर झाल्या, पण निधी मिळत नाही. आम्ही काम करायचं नाही का? एका वॉर्डाला निधी आणि दुसऱ्याला नाही, हे कसं चालेल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“विरोधी पक्षनेता का नाही?”
“खालच्या सभागृहात आम्हाला अद्याप विरोधी पक्षनेता नेमलं नाही. का नाही, हे लिहून द्या, असं आम्ही अध्यक्षांना सांगितलं. पण ते बोलायला तयार नाहीत. आमचं संख्याबळ कमी आहे का? तसं असेल तर ते स्पष्ट करा,” असं परब म्हणाले.
“सभापती विरोधकांचा आवाज दाबतात”
“आम्ही विधान परिषदेच्या सभापतींवर अविश्वास ठराव आणला आहे. ते आम्हाला बोलू देत नाहीत, विरोधकांचा आवाज चिरडला जातोय. आमदार अपात्रतेचा निर्णयही रखडलाय. ‘न्यायाला उशीर म्हणजे न्याय नाकारणं’ हे आहे. आम्ही अल्पसंख्याक झाल्याने यांना सत्तेचा माज आलाय. आमचा अविश्वास ठराव नाकारून लगेच विश्वासदर्शक ठराव आणला गेला. नियम काय सांगतो, हे तरी दाखवा. घटनापीठावर बसलात म्हणून आम्हाला आव्हान देता येत नाही, म्हणून आता थेट सभापतींवरच अविश्वास ठराव दाखल केलाय,” असं परब यांनी ठणकावलं.





