अनिल देशमुखांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; अटकेची टांगती तलवार कायम

नवी दिल्ली – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे. यामुळे त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या असून अटकेची टांगती तलवार कायम आहे.
या याचिकेवर न्या. डीवाय चंद्रचूड आणि न्या. एमआर शहा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अनिल देशमुख यांच्यासाठी आता सीबीआय प्रकरणातील दिलासा मिळवण्याचा न्यायालयीन मार्ग संपल्यात जमा आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 5 एप्रिल रोजी जे निर्देश दिले होते, ज्यामध्ये अनिल देशमुख यांनी त्यांच्या विरोधात सीबीआयने जो गुन्हा दाखल केलेला आहे, तो चुकीचा असून तो रद्द करण्याची मागणी केलेली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आदेश योग्यच आहे आणि त्यात आम्ही कुठलाही हस्तक्षेप करण्यास इच्छुक नाही, असे सर्वोच्च न्यायलायाने नमूद केले. यामुळे आता सीबीआयची कारवाई पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता अनिल देशमुखांना चौकशीसाठी पुन्हा देखील बोलावले जाऊ शकते. एवढेच नाही तर आता त्यांच्या अटकेची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांना ईडीने आतापर्यंत 5 वेळा समन्स बजावले आहेत. अखेरचे समन्स मंगळवार, 17 ऑगस्ट रोजी बजावले होते. आज त्यांना ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, आज देखील अनिल देशमुख चौकशीसाठी उपस्थित राहिले नाही.
अनिल देशमुखांना ईडीसमोर हजर राहता येणार नसल्याचा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांचे वकिल इंदरपाल सिंग ईडीच्या कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.





