मुंबई : दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी छोट्या परंतू उच्च तीव्रतेच्या व शेजारील देशांशी असलेल्या प्रादेशिक वादांमुळे होवू शकणाऱ्या दीर्घकालीन युद्धांसाठी भारताने तयार राहिले पाहिजे, असे मत संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी व्यक्त केले. आय आयटी मुंबई येथे एका कार्यक्रमासाठी अनिल चौहान यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, भारताला दोन प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. आपल्या दोन्ही शेजारी देशांकडे अण्वस्त्रे आहेत. त्यामुळे अणु-प्रतिबंधकतेची मर्यादा ओलांडली जाऊ नये, याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पाकिस्तान व चीन या दोन्ही देशांचा नमोल्लेख टाळला. आधुनिक युद्धाच्या स्वरूपावर भाष्य करताना सीडीएस यांनी सांगितले की, बहु-डोमेन ऑपरेशन्स (मल्टी-डोमेन ऑपरेशन्स) आता पर्याय नसून आवश्यकता बनल्या आहेत. एका क्षेत्रातील कारवाईचे परिणाम तात्काळ दुसऱ्या क्षेत्रात जाणवतात. ऑपरेशन सिंदूरमध्ये हे स्पष्टपणे दिसून आले. अवघ्या चार दिवसांत झालेल्या या कारवाईत जमिनीवर, आकाशात, सायबर आणि इतर सर्व क्षेत्रांत एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर शक्तीचा वापर करण्यात आला, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी समन्वय आवश्यक आधुनिक युद्ध हे ‘कन्व्हरजंट वॉरफेअर’ टप्प्यावर पोहोचले आहे. ज्यामध्ये एआय, क्वांटम तंत्रज्ञान, एज कम्प्युटिंग, हायपरसोनिक प्रणाली आणि रोबोटिक्स यांसारखे अनेक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागतो. याचा परिणाम युद्धावर होते. मल्टी-डोमेन ऑपरेशन्ससाठी मल्टी-डोमेन क्षमता व क्रॉस-डोमेन कमांड व कंट्रोलची आवश्यकता आहे. यासाठी लष्कर, नौदल, हवाई दल, सायबर, अंतराळ अशा सर्वांमध्येच समन्वयाची आवश्यकता असल्याचे सीडीएस चौहान म्हणाले.