मुंबई : अनिल धीरूभाई अंबानी समूहातील रिलायन्स कम्युनिकेशन म्हणजे आर कॉम कंपनीचे खाते फ्रॉड या सदरात वर्गीकृत करण्याचा निर्णय स्टेट बँकेने बुधवारी घेतला होता. या पार्श्वभूमीवर या उद्योग समूहाने असे स्पष्ट केले आहे की, स्टेट बँकेच्या या निर्णयाचा या समूहातील इतर कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम झालेला नाही. त्यामध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स पॉवर या कंपन्यांचा समावेश आहे.
या समूहाने शेअर बाजारांना कळविलेल्या माहितीत म्हटले आहे की, रिलायन्स कम्युनिकेशनचे खाते फ्रॉड ठरविल्यानंतर या समूहातील इतर कंपन्यांच्या कामकाजावर किंवा व्यवहारावर कसलाही परिणाम झालेला नाही किंवा होण्याची शक्यता नाही. कारण रिलायन्स कम्युनिकेशन ही वेगळी कंपनी आहे. इतर कंपन्यांचा या कंपनीशी फारसा संबंध नाही. या दोन्ही कंपन्यांनी शेअर बाजारांना या संदर्भात वेगवेगळी माहिती सादर केली आहे.
रिलायन्स कम्युनिकेशन संदर्भात स्टेट बँकेने अनिल अंबानी यांचेही नाव घेतले असले तरी अनिल अंबानी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर किंवा रिलायन्स पॉवर या कंपन्यांच्या संचालक मंडळावर नाहीत असेही या उद्योग समूहाने शेअर बाजारांना कळविले आहे. त्यामुळे स्टेट बँकेने रिलायन्स कम्युनिकेशनवर कोणतीही कारवाई केली तरी त्याचा परिणाम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर किंवा रिलायन्स पॉवर या कंपन्यावर होणार नाही.