मुंबई: उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स ग्रुपभोवती ईडीचा फास अधिकाधिक आवळत चालला आहे. येस बँक आणि ग्रुप कंपन्यांशी संबंधित कथित फसवणूक प्रकरणात ईडीने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत 1,120 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या 18 मालमत्ता जप्त केल्या आहेत. या ताज्या कारवाईमुळे अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या आहेत. यापूर्वी जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांसह आतापर्यंत 10,117 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL) आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (RCFL) च्या मालमत्तांचा समावेश आहे. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, रिलायन्स पॉवर लिमिटेड, रिलायन्स व्हॅल्यू सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीच्या 18 हून अधिक स्थावर मालमत्ता, एफडी, बँक शिल्लक आणि विविध कंपन्यांमधील गुंतवणुका समाविष्ट आहेत. हे प्रकरण रिलायन्स होम फायनान्स, रिलायन्स कमर्शियल फायनान्स आणि येस बँकेतील कथित फसवणुकीशी संबंधित आहे. २०१७-२०१९ दरम्यान, येस बँकेने RHFLमध्ये २,९६५ कोटी रुपये आणि RCFLमध्ये २,०४५ कोटी रुपये गुंतवले होते., जी नंतर एनपीए (Non-Performing Asset) बनली. ईडीच्या तपासानुसार, 11,000 कोटींहून अधिक सार्वजनिक निधी RHFL आणि RCFL ला मिळाला होता. SEBI चे नियम टाळण्यासाठी ‘सर्किटस रूट’ वापरून हा निधी ग्रुप कंपन्यांपर्यंत पोहोचवण्यात आला, असा आरोप आहे. सीबीआयच्या एफआयआरवर आधारित ईडीची चौकशी सुरू असून, अनिल अंबानी ग्रुपवर सातत्याने कारवाईचा बडगा उगारला जात आहे.