नवी दिल्ली : उद्योगपती अनिल अंबानी आणि येस बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांच्या विरोधात गुरूवारी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले. भ्रष्टाचार प्रकरणी ते पाऊल उचलण्यात आले. अनिल अंबानी यांच्या समुहातील एफएल आणि आरएचएफएल या कंपन्यांचे येस बँक, कपूर यांच्या कुटूंबीयांशी संबंधित कंपन्यांशी काही व्यवहार झाले. त्या व्यवहारांमधील फसवणुकीमुळे बँकेचे तब्बल २ हजार ७९६ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणी सीबीआयने मुंबईतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यामध्ये बिंदू कपूर, राधा कपूर आणि रोशनी कपूर यांनाही आरोपी करण्यात आले. बँकेने दिलेल्या तक्रारीवरून सीबीआयने संबंधित प्रकरणी तपास सुरू केला. ताज्या घडामोडीवर अनिल अंबानी समुहाची प्रतिक्रिया तातडीने मिळू शकली नाही.