मुलांने मागितला 11 लाख रुपये हुंडा, नकार दिल्यावर मोडले लग्न, मुलाच्या घराबाहेर निदर्शनास बसली नवरी

भरतपूर – जगभरात आज 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. महिला दिनाच्या दिवशीच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हुंड्यासाठी मुलाने लग्न मोडले असल्याची घटना घडली आहे. दरम्यान लग्न मोडणाऱ्या मुलाच्या घराबाहेर नवरी निदर्शानास बसली आहे. एकीकडे महिला दिन साजरा केला जात आहे तर दुसरीकडे महिला हुंडाबळीच्या अजूनही शिकार होताना दिसून येत आहे.
नवरी निदर्शानास बसल्यामुळे मुलाच्या नातेवाईकांनी घराची दारे बंद केली आहेत. तिच्या सततच्या आरडाओरडानंतरही कोणीही दरवाजा उघडला नाही. तरुणीला पाहून आजूबाजूच्या लोकांनी तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तेव्हा जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत इथेच निदर्शन करणार असल्याचे मुलीने सांगितले आहे.
हाऊसिंग बोर्ड परिसरात राहणाऱ्या खुशबूचे लग्न प्रिन्स नगर येथील कौशल्य सोबत ठरवले होते, मात्र मुलाकडून 11 लाख रुपये हुंड्याची मागणी केली गेली. मुलीच्या वडिलांनी एवढी मोठी रक्कम देण्यास नकार दिला. त्यामुळे नाराज झालेल्या मुलाकडच्या नातेवाईकांने लग्नास नकार दिला. रात्री उशिरापर्यंत मुलाच्या मिरवणुकीची वाट पाहिल्यानंतर मुलीच्या वडिलांनी मथुरा गेट पोलिस ठाणे गाठून याबाबत तक्रार दाखल केली.





