नवी दिल्ली :- अखिलाडूवृत्तीने मला टाईमआऊट केल्यानंतर माझ्या मनातून संपूर्ण बांगलादेशचा संघ उतरला. त्यामुळेच आमच्या कर्णधारासह सामना संपल्यावरही आम्ही त्यांच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही, असे श्रीलंकेचा अष्टपैलु अँजेलो मॅथ्युजने म्हटले आहे.
हा सामना बांगलादेशने जिंकला असला तरीही त्यांचा कर्णधार शकिब अल हसन व अन्य सहकारी खेळाडूंनी अत्यंत अखिलाडूवृत्ती दाखवली. माझ्या हेल्मेटचा स्ट्रॅप खेळपट्टीवर आल्यावर तुटला व त्यामुळे मी नवे हेल्मेट मागवले. त्यात वेळ गेला होता हे मान्य करतो परंतू हे कारण माहिती असूनही शकिबसह अन्य सहकारी खेळाडूंनी माझ्याविरुद्ध टाइमआऊटचे अपील केले व पंचांनीही माझी बाजू ऐकून न घेता नियनानूसार मी बाद असल्याचे घोषित केले. असा नियम आहे हे देखील मला माहिती होते मात्र, विश्वकरंडकासारख्या इतक्याप्रतिष्ठेच्या स्पर्धेत कोणता संघ अशी अखिलाडूवृत्ती दाखवेल असे मला वाटलेच नव्हते, त्यामुळेच मी संतापलो होतो, असे मॅथ्युज म्हणाला.
चार सेकंद होती…
हेल्मेटचा स्ट्रॅप तुटल्याचे लक्षात आल्यावर मी दुसरे हेल्मेट मागवले होते व त्यावेळी तीन मिनिटे पूर्ण होण्यासाठी चार सेकंद बाकी होते मात्र, त्यावेळी पंच काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सामनाधिकाऱ्यांनीही यात हस्तक्षेप केला नाही याचेही मला आश्चर्य वाटले, असेही मॅथ्युज म्हणाला.
नियमाचा लाभ घेतला – शकिब
मॅथ्युजला खेळपट्टीवर येण्यासाठी वेळ लागला, तसेच त्याचवेळी त्याच्या हेल्मेटची स्ट्रॅप तुटली त्यातही वेळ गेला. माझ्या एका सहकारी खेळाडूने मला टाइमआऊटच्या नियमाबदद्ल सांगितले व मी पंचांकडे अपील केले. पंचांनी मॅथ्युजला बाद दिले. जर आयसीसीनेच असा नियम तयार केला आहे तर त्याचा आम्ही केवळ लाभ घेतला. यात आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही तसेच ही अखिलाडूवृत्तीही नाही, असे मत बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने म्हटले आहे.
सुरक्षेला प्रधान्य हवे..
माझे हेल्मेट बदलणार होतो पण पंचांनी मला बाद ठरवल्याने आम्ही ड्रेसिंगरुमकडे परतलो. खरेतर आयसीसीने हेल्मेट वापरणे बंधनकारक केले आहे तसेच त्याखालील स्ट्रॅपही अनिवार्य केला आहे मग तरीही सुरक्षेला प्राधान्य का दिले गेले नाही, असा सवालही मॅथ्युजने विचारला आहे.