लंडन : ब्रिटनच्या उपपंतप्रधान ऍंजेला रेयनर यांनी शुक्रवारी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला. उपपंतप्रधानपदाबरोबरच गृहसचिव पदाचाही त्यांनी राजीनामा दिला. रेयनर यांनी अलिकडेच खरेदी केलेल्या घरावरील पूर्ण कर त्यांनी भरलेला नसल्याचे अंतर्गत चौकशीच्या अहवालामध्ये निष्पन्न झाले होते. त्यानंतर लगेचच रेयनर यांनी राजीनामा दिला. रेयनर या मजूर पक्षाच्या ताकदवान नेत्या समजल्या जातात. घरावरील पूर्ण कर न भरून त्यांनी मंत्र्यांसाठीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे पंतप्रधान कीर स्टार्मर यांना आपल्या मंत्रिमंडळाची तातडीने फेररचना करावी लागते आहे. मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांमध्ये फेरबदल केला जाऊ लागला आहे. आपल्या मंत्रिमंडळ चमूतील सर्वात वरिष्ठ सहकारी मंत्री महिलेला वगळावे लागत असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला आहे. तटस्थ सल्लागारांनी रेयनर यांच्या वर्तणुकीबद्दल दिलेल्या अहवालामध्ये त्यांना पदावर राहू दिले जाऊ नये, अशी शिफारस पंतप्रधान स्टार्मर यांच्याकडे केली होती. रेयनर यांनी यापुर्वी गृहनिर्माण, समुदाय आणि स्थानिक सरकार मंत्रालयाचे राज्य मंत्री म्हणूनही काम केले होते. अतिरिक्त तज्ज्ञ कर सल्ला न घेण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल खूप पश्चात्ताप होतो आहे. पण तसे करण्याचा आपला कधीही हेतू नव्हता. योग्य निधीचा कर भरला जायला हवा होता. या प्रकरणी आपल्या कुटुंबावर मोठा दबाव येऊ लागला असल्याचेही रेयनर यांनी पंतप्रधान स्टार्मर यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.