अहमदनगर | मोहिमेसाठी अंगणवाडी सेविका सरसावल्या

खेड – लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी व योजनेच्या अंमलबजावणीसाठी खेडच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू केलेल्या मोहिमेला चांगलाच प्रतिसाद मिळाला. योजनेसाठी लागणारी कागदपत्रे व योजनेबद्दलची माहिती सांगणारे माहितीपत्रक देऊन सेविकांनी जनजागृती केली. ऑफलाईन अर्ज स्वीकारत आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहिणींना दिलासा दिला.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे’ अर्ज भरून घेण्यासाठी दोन दिवसीय विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरून घेण्यासाठी खेड भागातील अनेक ग्रामपंचायती प्रकर्षाने कार्यरत दिसल्या. खेड ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाडक्या बहीण योजनेबद्दल व त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्राबद्दल माहिती सांगणारी स्वागतकमान तयार करण्यात आली. जनजागृतीसाठी बॅनरही लावण्यात आले आहेत.
ग्रामपंचायत कार्यालयात आलेल्या बहिणींचे अर्ज भरून देण्याचे व माहिती देण्याचे काम अंगणवाडी सेविका सुनंदा मोरे, सपना सायकर, छाया मोरे, शारदा खंडागळे, आशा सेविकाबबई मोरे, रुपाली मोरे, मदतनिस निगार शेख आदींनी केले.
गट-तट न पाहता योजनांचा लाभ घ्या!
लाडक्या बहिणींना अर्ज भरण्यासाठी धावपळ व त्रास होऊ नये, ही प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रयत्नशील आहोत. आ.राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे सर्व पदाधिकारी तळागाळापर्यंत पोहोचत आहेत. राजकीय गट-तट न पाहता आपल्यासाठी असलेल्या योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय मोरे यांनी केले.





