Andhra Pradesh : आंध्रमधील फटाका कारखान्यात आग; 6 जणांचा मृत्यू

रायावरम (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशच्या डॉ. बी.आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील फटाके उत्पादन करणाऱ्या कारखान्यामध्ये बुधवारी लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले. दुपारी १ वाजताच्या सुमारास घडलेला हा अपघात फटाके उत्पादन युनिटमधील निष्काळजीपणामुळे झाला असावा असा पोलिसांना संशय आहे.
पोलिस अधीक्षक राहुल मीना यांनी सांगितले की, फटाके उत्पादन युनिट परवानाधारक असून १९३२ पासून फटाक्यांचा व्यवसाय करत आहेत. सहा मृतदेह सापडले आहेत. आम्ही मृतदेहांची माहिती पडताळत आहोत. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रामचंद्रपुरम उपविभागीय पोलिस अधिकारी बी. रघुवीर यांच्या म्हणण्यानुसार कारखान्याला गेल्या पंधरा दिवसांत दोनदा इशारा देण्यात आला होता आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना नोटिसा बजावल्या होत्या.
दरम्यान, मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी कारखान्यातील मृत्युंबद्दल दुःख व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना अपघातस्थळी भेट देऊन बचाव कार्यांवर देखरेख करण्याचे निर्देश दिले आणि पीडितांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे आश्वासन दिले. विरोधी पक्षनेते आणि वायएसआरसीपीचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी यांनी कोनासीमा जिल्ह्यातील दुःखद घटनेबद्दल तीव्र शोक आणि दुःख व्यक्त केले. शोकग्रस्त कुटुंबांबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करताना, त्यांनी सरकारला त्यांना उदारतेने मदत करण्याचे आवाहन केले.





