Andaz movie : आठवणीतला सिनेमा – अंदाज ( १९४९)
Andaz movie : १९४९ साली आलेल्या अंदाज चित्रपटाने अनेक नवीन विक्रम प्रस्थापित केले आणि हिंदी चित्रपट सृष्टीला नवीन दिशा देणारा चित्रपट ठरला तो म्हणजे अंदाज...

Andaz movie : १९४९ साली आलेल्या अंदाज चित्रपटाने अनेक नवीन विक्रम प्रस्थापित केले आणि हिंदी चित्रपट सृष्टीला नवीन दिशा देणारा चित्रपट ठरला तो म्हणजे अंदाज… त्याच साली बरसात प्रदर्शित झाला पण अंदाज च्या नंतर… तोपर्यंत व्यावसायिक दृष्ट्या बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरणारा पहिला चित्रपट होता तो म्हणजे अंदाज. आजही अंदाज चित्रपटाची जादू 77 वर्ष झाले तरीही कायम आहे..
दमदार आणि सशक्त कथानक, मेहबूब यांचं अप्रतिम दिग्दर्शन, कलाकारांचा उत्तुंग अभिनय, श्रवणीय सुमधुर आणि सुरेल नौशाद साहेबांनी केलेली गाणी त्यामुळे अंदाज चित्रपट चिरकाल स्मरणात राहील यात तीळ मात्र शंका नाही.
हिंदी चित्रपट सृष्टीत पहिल्यांदाच प्रेमाचा त्रिकोण ही संकल्पना मेहबूब यांनी अंदाज द्वारे पडद्यावर आणली आणि तो ट्रेंड सेट झाला आणि त्यानंतर बरेच प्रेमाच्या त्रिकोणावर चित्रपट आले पण अंदाज ची सर मात्र कोणत्याही सिनेमाला येऊ शकली नाही.
अहंकार, अव्यक्त भावना आणि गैरसमजातून निर्माण झालेली तेढ व प्रेमाच्या त्रिकोणाची शोकांतिका म्हणजे अंदाज.. राज कपूर दिलीप कुमार आणि नर्गिस यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरलेली कलाकृती म्हणजे अंदाज..
राज आणि दिलीप यांना प्रथमच आणि शेवटचं पडद्यावर एकत्र आणण्याचं काम मेहबूब यांनी केलं… देखणा राजबिंडा दिल फेक बेधडक पण तेवढाच संशयी पुरुषी अहंकार बाळगणारा राज कपूर, संयमी, भावनिक, एकतर्फी प्रेम करणारा दिलीप कुमार..दिलीप कुमारला ट्रॅजिडी किंग ची ओळख देणारा हा सिनेमा.
त्यानंतर कुठल्याही चित्रपटात हे दोघे दिग्गज कलाकार एकत्र दिसले नाहीत.. त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी म्हणजे जणू एक पर्वणीच आहे..
आधुनिक विचारांची,उच्चभ्रू संस्कृतीची स्त्री नर्गिस ने अगदी उत्तमरित्या साकारली आहे आणि तिचा तोडीस तोड अभिनय ही या सिनेमाची जमेची बाजू…
चित्रपटातील सर्वच गाणी अतिशय सुमधुर आणि श्रवणीय आहेत.. दिलीप कुमारच्या व्यक्तिरेखेला साजेशी करूण स्वरातील मुकेश ची पियानो वरील गाणी निव्वळ अप्रतिम.. आणि तेवढीच अतिशय तरल, गोड आणि सुमधुर लतादीदींच्या आवाजातील गाणी… फक्त एका गाण्यासाठी राजकपूरला रफी साहेबांनी प्लेबॅक दिला आहे… नंतर मात्र अगदी उलट झालं मुकेश हा राज साहेबांचा आवाज झाला आणि रफी साहेबांनी दिलीप साहेबांना प्लेबॅक दिला…
मजरू साहेबांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून लिहिलेली अर्थपूर्ण गाणी आणि त्यावर नौशाद साहेबांनी चढवलेला स्वरसाज… सर्वकालिक गाजलेल्या गाण्यांमध्ये अंदाज ची सर्व गाणी प्रामुख्याने गणली जातात… अंदाज च्या रेकॉर्डवरील पियानोवर गाणं म्हणणारा दिलीप आणि त्याच्याकडे पाहणारे नर्गिस आणि राज कपूरचा फोटो आजही कायम स्मरणात आहे..
शम्स लखनवी यांची सशक्त कथा आणि तेवढीच दमदार अली रझा यांची पटकथा आणि मेहबूब यांचे कसदार दिग्दर्शन यामुळे अंदाज एक वेगळीच उंची गाठतो..
इतकी वर्ष होऊन सुद्धा आजही अंदाज पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो हेच या चित्रपटाचे यश आहे… चित्रपटातील अनेक प्रसंग लक्षात राहतात पण वाढदिवसाच्या पार्टीतील नर्गिसचा कबुली जबाब हा या चित्रपटाचा हायलाईट आहे…
सर्वच बाबतीत वरचढ ठरणारा सिनेमा म्हणजे अंदाज… अशी अजरामर कलाकृती पुन्हा होणे नाही…
-राहुल सराफ, नागपूर

