लातूर – शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कटुता विसरत तीन वर्षांनी एकाच व्यासपीठावर आले. विशेष म्हणजे यावेळी हातात हात घालून मोदी आणि उद्धव ठाकरेंनी मंचावर प्रवेश केला. युती अभेद्य असल्याचा संदेश कार्यकर्त्यांना दिला. लातूरमधील औसा येथे महायुतीच्या प्रचारासाठी मोदी व उद्धव यांची संयुक्त सभा झाली.
शिवसेना पक्षप्रमुख आणि धाकटे बंधू उद्धव ठाकरे असा उल्लेख करत पंतप्रधानांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेत, सिद्धेश्वर महाराजांचा आशीर्वाद असा उल्लेख मोदींनी सुरुवातीलाच केला. यावेळी मोदींनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कौतुक केले.
दरम्यान, शिवसेना आणि भाजपमध्ये लहान आणि मोठा भाऊ कोण यावरून नेहमीच जुंपलेली पाहायला मिळाले आहे. युती होण्याआधीची संजय राऊत यांनी मोठा भाऊ मोठा असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर आता पंतप्रधानांनी पुन्हा एकदा उद्धव यांचा धाकटे भाऊ म्हणून उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.