अन् तिची व्यथा ऐकून डोळेच पाणावले…!

घरची आर्थिक स्थिती बेताची… दहावी आणि बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय? पुढे कसे शिकायचे… आई-वडिलांनाही खूप शिकावे अशी इच्छा; पण एवढा पैसा नाही… नातेवाईक म्हणतात पोरीने शिकून काय करायचे… लग्न करून टाका… पण पुढे शिकण्याची जिद्द होती… वृत्तपत्रात शिक्षणाच्या मदतीबाबत वाचनात आले अन् लगेच दूरध्वनी केला. दिशा परिवार का, असे विचारले. तिकडून राजाभाऊ म्हणाले, होय बाळं, बोल. आई धुणे-भांडी करते.
मला पुढे शिकायचे आहे; पण पैसा नाही. मला मदत हवी. असे दोन ते तीन दूरध्वनी झाले. मला पुण्यातही जावे लागले नाही. थेट मला पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत पोहोच झाली… हे सांगताना माधुरी चोपडे हिच्या दृष्टीने ही मदत किती मोलाची ठरली हे तिच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शब्दांत व्यक्त करताना मान्यवरांसह सर्वांचे डोळे पाणावले.
जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी या गावातील माधुरी चोपडे सध्या इंजिनिअरचे शिक्षण घेत आहे. ती म्हणाली की, बारावीनंतर पुढचे शिक्षण कसे होणार, असा प्रश्न होता. आई धुणे-भांडी करते. त्यातून पुढचे शिक्षण घेणे शक्य नव्हते. त्या वेळी राजाभाऊ यांनी मला मदतीचा हात दिला. नातेवाईक केवळ बघ्याच्या भूमिकेत होते. ते उलट आईला म्हणाले, पोरीला शिकविण्यापेक्षा तिचे लग्न करून टाक; परंतु आई म्हणाली, नाही. तिला शिकू द्या.
महाविद्यालयाची फी भरण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा आमची अडचण पाहून राजाभाऊ यांनी आर्थिक मदतीसाठी मेधा देशपांडे दाते दिले. त्यामुळे आज पुढील शिक्षण घेत आहे. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्याची असलेली जिद्द आणि जिद्दीला मिळालेली मदतीची जोड यामुळे आम्ही पुढील शिक्षण करू शकत आहे. आज समाजात मदत करणारी माणसे कमी आहे. पण जी काही आहे, त्या दैनिक प्रभात व दिशा परिवार आमच्यासाठी देवच आहेत.





