जांबुत : राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवार (दि. ०७) रोजी पिंपरखेड येथील बिबट हल्ल्यात मयत झालेल्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. साहेब, माझ्या बाळाला पोलीस व्हायचं होत ओ, पण माझं स्वप्न तो अपुर ठेवून आपल्यातून गेला, आता मी जगायचं कोणासाठी, साहेब मला सरकाराचं पैसं नको, पण मला माझा रोहन परत द्या. माझा रोहन अन ऋतिक राम लक्ष्मणाची जोडी होती, पण माझा राम आता गेला, अशी आर्त किंकाळी रोहनच्या आई वडिलांनी फोडताचं माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना रडू कोसळले. यावेळी बोंबे कुटुंबियांच्या दुःखाच्या वेदना या माझ्याच वेदना असून मला एकच मुलगी आहे. तर आजपासून ऋतिक हा माझा मुलगा समजून मी त्याचे पालकत्व स्वीकारत असून आजपासून त्याच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी जाहिर केले. तर मयत रोहन याचे वडील विलास हे माझ्या भावासमान असून ज्या ज्या वेळी गरज पडेल, त्यावेळी कोणत्याही मदतीसाठी मला थेट संपर्क करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या कुटुंबाचा घटक या नात्याने या कुटुंबाची गरीबीची परिस्थिती पाहता शासन स्तरावरून आणि मी स्वतः वैयक्तिक घर बांधून देण्यासाठी प्रयत्नाशील राहणार असून या वस्तीवर येण्यासाठी ज्या ठिकाणाहून रस्त्याची आवश्यकता असेल त्या ठिकाणाहून तातडीने रस्ता तयार करून देण्यात येईल अशा सूचना अधिकाऱ्यांना देऊन हाही प्रश्न तातडीने मार्गी लागेल असेही यावेळी त्यांनी सांगितले.