अनंत अंबनी आणि उद्धव ठाकरेंची भेट; ‘मातोश्री’वर दोन तास काय झाली चर्चा?

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांनी मंगळवारी रात्री उशिरा मातोश्रीवर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत या दोघांत जवळपास 2 तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील समजला नाही. पण ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंबानींच्या मुलाने उद्धव ठाकरेंची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
दरम्यान, ठाकरेंची भेट घेतल्यानंतर अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. अनंत अंबानी मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर भेटीसाठी पोहोचले. त्यानंतर रात्री उशिरा ते मातोश्रीबाहेर पडले.
उल्लेखनीय बाब म्हणजे अंबानी कुटुंबाचा देशाच्या राजकारणावर मोठा प्रभाव आहे. त्यांचे ठाकरे घराण्याशी सलोख्याचे संबंध आहेत. अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्यातील प्रत्येक समारंभाला उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक हजेरी लावली होती. विशेषतः उद्धव यांचे कनिष्ठ सुपुत्र तेजस ठाकरे यांनी अनंत यांच्या लग्नात डान्सही केला होता. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
एकनाथ शिंदेंचीही घेतली भेट –
अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या येथील शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ते तिथे मध्यरात्री 12 च्या सुमारास पोहोचले. त्यानंतर काही वेळातच त्यांनी घरचा रस्ता धरला. या दोघांत नेमकी कोणती चर्चा झाली? हे ही अजून समोर आली नाही. पण ठाकरेंनंतर अंबानी शिंदेंच्या घरी गेल्यामुळे त्याचीही चर्चा रंगली आहे.




