मुंबई – सरलेल्या केवळ 11 महिन्यांमध्ये चीनची निर्यात आयातीपेक्षा एक लाख कोटी डॉलरने जास्त झाल्याबद्दल जगभरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र ही निर्यात चीनच्या केवळ नाविन्य आणि स्पर्धात्मकतेमुळे वाढलेली नाहीत तर चीनने ठरवून स्वतःच्या चलनाचे मूल्य कमी पातळीवर ठेवल्यामुळे ही निर्यात वाढण्यास मदत झाल्याचे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. कोटक म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश शाह यांनी यासंदर्भात सांगितले की, चीनमधील कर्मचारी कष्ट करतात. नावीन्य आणि संशोधनामुळे त्यांच्या उत्पादनाचे दर स्पर्धात्मक असतात याबद्दल बोलले जात आहे. मात्र चीनने आपल्या युआन या चलनाचे मूल्य ठरवून कमी पातळीवर ठेवले आहे, याची दखल क्वचित घेतली जाते. चीनमधील वृत्त माध्यमे चलनाच्या अवमूल्यनकडे दुर्लक्ष करून चीन सरकार आणि चीनमधील उद्योग कशाप्रकारे वस्तूच्या किमती कमी ठेवून निर्यात वाढविण्यात यश मिळवत असल्याचे सांगत आहेत, या बाबीकडे शहा यांनी लक्ष वेधले. चीनच्या युआन या चलनाच्या मूल्याचा आढावा घेऊन शहा यांनी सांगितले की, ही चीनमधील निर्यात आयातीपेक्षा जास्त वाढत असेल तर चीनच्या चलनाचे मूल्य बाजाराच्या शास्त्रानुसार वाढायला पाहिजे. मात्र गेल्या 25 वर्षापासून या मूल्यात फारशी वाढ झालेली नाही. याच कालावधीमध्ये चीनची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 2000 मध्ये चीनच्या युआन चलनाचे मूल्य प्रति डॉलर 8.28 इतके होते. आता ते किंचित वधारून 7.70 इतके झाले आहे. म्हणजे या 25 वर्षाच्या कालावधीत एवढी निर्यात वाढून चीनचे चलन फक्त 15% वाढले आहे. यातून चीनने या 25 वर्षात ठरवून चलनाचे मूल्य कमी पातळीवर ठेवून निर्यात स्पर्धात्मक केली असल्याचे दिसून येते. चीनच्या चलनाचे मूल्य कमी पातळीवर ठेवण्यासाठी चीनची सेंट्रल बँक दैनंदिन पातळीवर चलन बाजारात हस्तक्षेप करून मूल्य वाढणार नाही याची काळजी घेत असते. त्यामुळे चीनची निर्यात गेल्या पंचवीस वर्षात वाढून चीनकडे जगात सर्वात जास्त परकीय चलन साठा आहे हा साठा जपानपेक्षा कितीतरी जास्त आहे. गेल्या शतकाच्या उत्तरार्धातही चीनने चलनाचे मूल्य कमी पातळीवर ठेवून निर्यात वाढविली. मात्र जपानच्या चलनाचे मूल्य या कालावधीत 81 टक्कंनी वाढले होते. त्या तुलनेत चीननेे आपल्या चलनाचे मूल्य वाढू दिले नाही.