CA Ravi Pandit: सीए रवी पंडित हे केवळ यशस्वी चार्टर्ड अकाउंटंट नव्हते, तर दूरदृष्टी असलेले उद्योजक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने सीए व्यवसाय, आयटी उद्योग आणि पुण्याच्या उद्योगविश्वाची मोठी हानी झाली आहे. चार्टर्ड अकाउंटंट झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील एमआयटी स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंट येथे उच्च शिक्षण घेतले. भारतात परतल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांची कीर्तने आणि पंडित ही सीए फर्म पुढे नेली. प्रामाणिकपणा, गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास यांमुळे ही फर्म अत्यंत प्रतिष्ठित बनली. त्या काळात भारतात संगणकाचा वापर नुकताच सुरू होत होता. रवी पंडित यांनी भविष्यात तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखून अकाउंटिंग, पगार व्यवस्थापन आणि व्यवसायासाठी सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम सुरू केले. याच प्रयत्नांतून पुढे केपीआयटी टेक्नॉलॉजीज या मोठ्या आयटी कंपनीची निर्मिती झाली. आज ही कंपनी जगभरातील वाहन उद्योगासाठी आधुनिक सॉफ्टवेअर तयार करते. इलेक्ट्रिक वाहने आणि स्मार्ट तंत्रज्ञान क्षेत्रात कंपनीने जागतिक ओळख निर्माण केली. रवी पंडित यांनी चार्टर्ड अकाउंटंट विद्यार्थ्यांसाठी आणि व्यावसायिक संस्थांसाठीही मोठे काम केले. एमसीसीआयए सारख्या उद्योग संस्थांमध्ये त्यांनी नेतृत्व केले आणि पुण्याच्या उद्योगवाढीत योगदान दिले. इतके मोठे यश मिळूनही ते अत्यंत साधे, शिस्तप्रिय आणि सर्वांना सहज भेटणारे होते. पर्यावरण संवर्धन आणि हरित उपक्रमांमध्येही त्यांना विशेष रस होता. त्यांचे जीवन अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. मेहनत, प्रामाणिकपणा, दूरदृष्टी आणि नवकल्पना यांच्या जोरावर जागतिक स्तरावर यश मिळवता येते, हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. व्यावसायिक नेतृत्वापलीकडे, रवी यांनी भारताचा नागरी आणि शाश्वतता अजेंडा घडवण्यात मध्यवर्ती भूमिका बजावली. त्यांनी पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि जनवाणी यांसारख्या संस्थांची सह-स्थापना करून त्यांना मार्गदर्शन केले, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स येथील सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटला पाठिंबा देऊन धोरण संशोधनाला बळकटी दिली आणि ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष म्हणून नेतृत्व विकासाला चालना दिली. त्यांनी थरमॅक्सच्या संचालक मंडळावर काम केले आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट, इंडिया व आगा खान रुरल सपोर्ट प्रोग्राम, इंडिया या संस्थांचे संचालक मंडळाचे सदस्य म्हणून राष्ट्रीय पर्यावरण आणि ग्रामीण विकासाच्या प्राधान्यक्रमांवर प्रभाव टाकला. – सीए चंद्रशेखर चितळे