Priyanka Chopra: ऑस्करच्या शर्यतीत भारतीय शॉर्ट फिल्म! प्रियंका चोप्राने स्वीकारली मोठी जबाबदारी
Priyanka Chopra भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी, यासाठी प्रियंका चोप्रा नेहमीच प्रयत्नशील असल्याचे दिसून आले आहे. ‘वी वर हीअर’ या चित्रपटाशी जोडले जाण्याची संधी मिळाल्याने तिने आनंद व्यक्त केला आहे.

Priyanka Chopra: जागतिक स्तरावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती कोणत्याही चित्रपटातील भूमिकेमुळे नव्हे, तर एका भारतीय शॉर्ट फिल्मशी जोडली गेल्यामुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक प्रणव भसीन यांच्या ‘वी वर हीअर’ या शॉर्ट फिल्मला प्रियंका चोप्राने साथ दिली आहे. विशेष म्हणजे, ही फिल्म ऑस्करसाठी पात्र ठरली असून, आता तिच्या ऑस्करच्या प्रवासात प्रियंका महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या चित्रपटाची कार्यकारी निर्माती (एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर) म्हणून ती काम पाहणार आहे.
प्रियंका चोप्राने व्यक्त केला आनंद
भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी, यासाठी प्रियंका चोप्रा नेहमीच प्रयत्नशील असल्याचे दिसून आले आहे. ‘वी वर हीअर’ या चित्रपटाशी जोडले जाण्याची संधी मिळाल्याने तिने आनंद व्यक्त केला आहे.
प्रियंकाने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे या चित्रपटाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. हा चित्रपट आजच्या काळातील महत्त्वाचा विषय एका वेगळ्या आणि मनोरंजक पद्धतीने मांडतो, असे तिने म्हटले आहे. या चित्रपटाची संकल्पना आणि त्यामागील सर्जनशील विचार तिला आवडले. त्यामुळे कार्यकारी निर्माती म्हणून या चित्रपटाशी जोडण्याची संधी मिळताच तिने होकार दिला. चित्रपटाच्या टीमला त्यांच्या कामासाठी योग्य ओळख मिळावी आणि त्यांची कल्पना अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, यासाठी आपण सहकार्य करू इच्छित असल्याचेही प्रियंकाने सांगितले.
८० हून अधिक आंतरराष्ट्रीय महोत्सवांत प्रदर्शन
प्रणव भसीन यांनी या शॉर्ट फिल्मचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. आतापर्यंत ८० हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाचे प्रदर्शन झाले आहे. या प्रवासात चित्रपटाने २० हून अधिक पुरस्कारही पटकावले आहेत.
अमेरिकेतील प्रसिद्ध साऊथ बाय साऊथवेस्ट (SXSW) चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला ‘ऑडियन्स अवॉर्ड फॉर बेस्ट नॅरेटिव्ह शॉर्ट’ आणि ‘रेडब्रेस्ट अनहिडन अवॉर्ड’ मिळाला. याशिवाय, पाम स्प्रिंग्स इंटरनॅशनल शॉर्टफेस्टमध्ये १५ मिनिटांपेक्षा कमी कालावधीच्या सर्वोत्कृष्ट लाइव्ह-अॅक्शन शॉर्ट फिल्मचा आणि सर्वोत्कृष्ट कॉमेडी शॉर्टचा पुरस्कार मिळाला.
फ्रान्समधील क्लेरमॉन्ट-फेरांड इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्येही चित्रपटाला ‘कॅनाल प्लस प्राइज’ मिळाला. याच महोत्सवात चित्रपटाचा जागतिक प्रीमियर झाला होता. पाम स्प्रिंग्समध्ये मिळालेल्या पुरस्कारामुळे हा चित्रपट ऑस्करसाठी पात्र ठरला.

Priyanka Chopra
काय आहे ‘वी वर हीअर’ची कथा?
‘वी वर हीअर’ या चित्रपटाची कथा भारतातील एका छोट्या शहरात राहणाऱ्या तीन निवृत्त पुरुषांभोवती फिरते. आजच्या काळात मशीन आणि तंत्रज्ञानामुळे माणसांच्या नोकऱ्या धोक्यात येत असल्याची चिंता या तिघांना सतावत असते. या परिस्थितीचा निषेध करण्यासाठी ते तिघेही एक अनोखा मार्ग निवडतात. घरात वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे रूप धारण करून ते आपला विरोध व्यक्त करू लागतात.
मात्र, त्यांच्या या प्रयत्नांना वेगळे वळण मिळते, जेव्हा त्यांच्यापैकी एका व्यक्तीच्या मुलाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित कंपनीत नोकरी मिळते. त्यामुळे त्यांच्या विचारांसमोर नवा प्रश्न उभा राहतो.
तंत्रज्ञान आणि रोजगारावर भाष्य
विनोदाच्या माध्यमातून या चित्रपटात तंत्रज्ञान, रोजगार आणि बदलत्या जगात माणसाचे स्थान या महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर आणि त्याचा मानवी आयुष्यावर होणारा परिणाम याबद्दल आज जगभर चर्चा सुरू आहे. अशा वेळी हा विषय मनोरंजक पद्धतीने मांडणारा ‘वी वर हीअर’ हा चित्रपट लक्ष वेधून घेत आहे. आता प्रियंका चोप्राच्या साथीमुळे या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी मोठी ओळख मिळण्यास मदत होते का आणि ऑस्करच्या शर्यतीत तो किती पुढे जातो, याकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.





