ब्रिस्टल (अमेरिका) : अमेरिकेत फिलाडेल्फिया शहरातील एका नर्सिंगहोमबाहेर झालेल्या मोठ्या स्फोटामध्ये किमान २ जण ठार झाले. या स्फोटामुळे इमारतीचा काही भाग कोसळला आणि या ढिगाऱ्याखाली इतर काही जण गाडले गेले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पेनसिल्वेनियाचे गव्हर्नर जोश शापिरो यांनी पत्रकार परिषदेत या स्फोटाची माहिती दिली. ब्रिस्टल शहरातील ब्रिस्टल हेल्थ ऍन्ड रिहॅबिलीटेशन सेंटरबाहेर हा स्फोट झाला. हा स्फोट गॅस गळतीमुळे झाला असण्याची शक्यता गृहित धरून तपास केला जात आहे. मात्र स्फोटानंतर काही तासांनंतरही या स्फोटाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. दुपारी सव्वा २ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या स्फोटानंतर या नर्सिंग होममधून काळ्या धुराचे लोट उठताना दिसत होते. तर गॅसचा वास देखील येत होता. गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून तातडीने दुरुस्ती करणारे कर्मचारी घटनास्थळी रवाना केले आहेत. तसेच फायर ट्रक आणि ऍम्ब्युलन्स घटनास्थळी जमा झाले होते. अवजड सामुग्रीच्या मदतीने ढिगारेही उपसले जाऊ लागले आहेत.