सातारा । माणवासीय मुंबईकरांसाठी सभागृह उभारणार

दहिवडी – माझ्या चाकरमानी मुंबईकरांनी मला भरभरुन प्रेम दिलं आहे. या माण-खटाव मधील मुंबईकरांसाठी हक्काचं स्व मालकीचं सभागृह मुंबईत उभारणार हा माझा शब्द आहे. माण-खटावच्या सर्वांगीण विकासासाठी मी आता मागं हटणार नाही असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केला.
कळंबोली येथे आयोजित मुंबईस्थित माण-खटाववासीयांच्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सतीश पाटील, राष्ट्रवादीचे माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, मकरंद बोडके, प्रमोद बागल, दिलीप तुपे, स्वप्नील काटकर, सुरेंद्र मोरे, नवनाथ हुलगे, गणेश मगर, भालचंद्र कदम, संग्राम मोरे, राजू डोंगरे, संतोष फडतरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रभाकर देशमुख म्हणाले, पोटापाण्यासाठी मुंबईकडे धाव घेणाऱ्या, सातत्याने परिस्थितीशी झगडणाऱ्या तरीही ताठ मानेने उभा राहणाऱ्या माझ्या माण-खटाववासीयांचा मला सार्थ अभिमान आहे. याच आपल्या जिवाभावाच्या माणसांची ओढाताण, वणवण, होरपळ थांबविण्याचा निर्धार मी केला आहे. चांगलं शिक्षण, उत्तम आरोग्य सुविधा अन हाताला काम हे आपल्या मतदारसंघातच मिळावे हे माझे ध्येय आहे. त्यासाठी जीवाचं रान करण्याची माझी तयारी आहे. विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता परिवर्तनाचे शिलेदार व्हा. सर्वांनी निवडणुकीच्या माध्यमातून माण-खटावच्या नव निर्मितीसाठी सज्ज व्हा.
हर्षदा देशमुख-जाधव म्हणाल्या, गेली १५ वर्षे पाण्याच्या प्रश्नावर निवडणूक लढविणारे पुन्हा एकदा या निवडणूकीत तोच फंडा वापरत आहेत. नुसत्या रानोमाळ पाईप टाकून भोळ्याभाबड्या जनतेला भूषविण्याचा प्रयत्न सुरू आहे. एवढीच जर तुमच्यात धमक होती तर आजपर्यंत माण-खटाव मधील माणसांना पिण्याचे पाणी का देवू शकला नाही? आजही इथल्या जनतेला टँकरच्या पाण्यावर का अवलंबून राहावे लागत आहे? यावेळी स्वप्नील काटकर, रोशन नलवडे आदींनी विरोधकांवर ताशेरे ओढत त्यांच्या कारभाराचे वाभाडे काढले.
पाऊस आणि राष्ट्रवादी
मुंबईस्थित माण-खटाव वासीयांच्या मेळाव्यासाठी कळंबोलीत जंगी नियोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने महिला, पुरुष जमा सुध्दा झाले होते. मात्र सभा सुरु होतानाच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तब्बल दोन ते अडीच तास जोरदार पाऊस झाला. अशा अवस्थेतही व्हरांड्यात बसून, उभे राहून लोकांनी वक्त्यांची भाषणं ऐकली. तर प्रभाकर देशमुख यांचे भाषण मुख्य सभा स्थळी पडत्या पावसात लोकांनी ऐकले. या सभेने मुंबईकरांना साताऱ्याच्या शरद पवारांच्या सभेची आठवण झाली.





