कराड -येथील शाहू चौकात रविवारी (दि. 12) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एका हॉटेलमध्ये नाश्ता करून बाहेर पडलेला गुंड अभिनंदन झेंडे व त्याच्या साथीदारावर चौघांनी कोयता, विळा, दांडक्यांनी हल्ला केला. हा हल्ला चुकवून झेंडे व त्याच्या मित्राने केश कर्तनालयात दडून पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अनिकेत रमेश शेलार (वय 21, रा. शास्त्रीनगर, मलकापूर), इंद्रजित हणमंतराव पवार (वय 23, रा. लाहोटीनगर, मलकापूर), सुदर्शन हणमंत चोरगे (वय 20, रा. कोयना वसाहत) व आशिष अशोक पाडळकर (वय 33, रा. सन सिटी, मलकापूर) या संशयितांना अटक केली.
त्यांच्याकडून हत्यारे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी अभिनंदन झेंडे याने कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सूरज गुरव यांनी दिलेली माहिती अशी, गुंड अभिनंदन झेंडे हा एका मित्रासमवेत रविवारी सायंकाळी 7 च्या सुमारास शाहू चौकातील हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी गेला होता. तेथून बाहेर आला असता एका कारमध्ये (एमएच-11-बीवाय-4040) दबा धरून बसलेल्या चौघांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी कोयता व विळ्याचे वार झेंडेवर केले. हे वार चुकवत झेंडे मित्रासह तेथून पळाला. तेथील एका केश कर्तनालयात
घुसून त्यांनी आतून कडी लावून घेतली. हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करून सलूनच्या दरवाजावर कोयता मारून झेंडेला धमकी दिली. त्यावेळी झेंडेच्या मित्राने सलूनमधूनच शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विजय गोडसे याना फोन केला.
त्यानंतर गोडसे हे हवालदार नितीन येळवे, देवा खाडे, संजय जाधव, प्रफुल्ल गाडे, होमगार्ड अमोल जंगम, अक्षय निकम, गणेश खुडे, चंद्रशेखर म्हेत्रे यांना घेऊन घटनास्थळी तातडीने पोहोचले. त्यांनी हल्लेखोरांना पकडले. शहरातील गुन्हेगारी टोळ्यांच्या हालचाली वाढल्या असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील हे त्यावर लक्ष ठेवून आहेत.
पोलिसांनी मोक्का, तडीपारीच्या कारवाया केल्याने अनेक गुंड शहरातून पळून गेले आहेत. करोनामुळे जामिनावर सुटलेल्या गुंडांची गुन्हेगारी कृत्ये सुरू झाली आहेत. त्यांच्यावर पोलिसांची करडी नजर आहे. त्यांना लवकरच तडीपार करण्यात येईल.
सूरज गुरज , पोलीस उपअधीक्षक.