अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

बेल्हे : गुंजाळवाडी (ता. जुन्नर) येथे (दि.24) एक अल्पवयीन मुलगी घरासमोर झाडांना पाणी घालत असताना दोन गुंडांनी तिच्या तोंडावर रुमाल टाकून चारचाकी गाडीतून पळवून नेले. गाडी 8 ते 10 किलोमीटर अंतरावर गेल्यावर ही मुलगी शुद्धीवर आल्यानंतर तिने आरडाओरडा केल्याने गुंडांनी मुलीला पिंपळझाप (ता.जुन्नर) येथील कळस रस्त्यावर सोडून देऊन पलायन केले. एका महिलेच्या सतर्कतेमुळे ही मुलगी सुखरुप घरी पोहोचली.
गुंजाळवाडी (ता. जुन्नर) येथील बुधवार (दि.24) दुपारी चारच्या सुमारास ही मुलगी घरासमोरील झाडांना पाणी घालत होती. त्यावेळी दोन गुंडांनी तिला पळवून नेले. मुलीला पिंपळझाप येथील कळस रस्त्यावर सोडल्यानंतर मुलगी रडत असताना महिलेने तिची विचारपूस केली. मुलीने गावाचा पत्ता सांगितला.
मुलीच्या घरच्यांनी गावात शोध सुरू केला होता. पिंपळझाप येथील नागरिकांनी मुलीच्या वडिलांशी संपर्क साधला. गुंजाळवाडीतील काही ग्रामस्थांनी मुलीला सुखरूप घरी आणले. बेल्हे येथील एका खासगी दवाखान्यात मुलीची आरोग्य तपासणी केली असता ती व्यवस्थित असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. चार ते पाच महिन्यांपूर्वी निमगाव सावा गावात प्रकार घडला होता. आळेफाटा पोलिसांनी कुटुंबीयांची भेट घेतली. शुक्रवारी उशिरापर्यंत आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला नव्हता.
ग्रामस्थांकडून अपहरणाचा निषेध
अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या घटना घडत आहेत. पोलिसांनी गुंडाचा कसून शोध घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. गोविंद बोरचटे, किसन बोरचटे, दत्ता यादव, विक्रम बोरचटे, दत्ता बोरचटे, मोहम्मद पठाण, हमिद मुजावर, जालिंदर गुंजाळ, प्रकाश नरवडे, रमेश कसबे, निलेश डुकरे, रमेश पवार, आदी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सोशल डिस्टन्स ठेवत घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.





