Donald Trump | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यापासून जगभरात पुन्हा व्यापार युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ट्रम्प हे सातत्याने इतर देशांवर अतिरिक्त टॅरिफ आकारण्याविषयी वक्तव्य करत आहे. ट्रम्प यांनी टॅरिफ युद्ध सुरू करून जगभरातील देशात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. मात्र, आता ट्रम्प यांच्या निर्णयाला देशांतर्गतच विरोध पाहायला मिळत आहे.
जगप्रसिद्ध गुंतवणूकदार व उद्योगपती वॉरेन बफे यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर टीका केली आहे. तसेच, हे एकप्रकारे युद्धासारखे पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या वॉरेन बफे यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, यामुळे मोठ्या प्रमाणात महागाई वाढवू शकते आणि त्याचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांवर होऊ शकतो. टॅरिफ वस्तूंवर एक प्रकारचा कर आहे, ज्याचा परिणाम शेवटी ग्राहकांवर होतो. हे एकप्रकारचे युद्धच आहे.’
ते म्हणाले की, वेळ जसजसा पुढे जातो, तसतसा टॅरिफ वस्तूंवर कर बनतो. याचा भरणा ग्राहकांना करावा लागतो. असे पाऊल उचलताना त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारे दीर्घकालीन परिणाम समजून घेणे महत्त्वाचे आहे.
बफे गेल्या महिन्यात म्हणाले होते की, त्यांची कंपनी बर्कशायर हॅथवेने ते चेअरमन बनल्यापासून अमेरिकेच्या सरकारला 60 वर्षांपासून 101 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक कर दिला आहे. हा आकडा जो इतिहासातील कोणत्याही इतर कंपनीपेक्षा जास्त आहे.
दरम्यान, ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनसह विविध देशांच्या वस्तूंवर अतिरिक्त कर आकारला जाणार असल्याची घोषणा केली आहे. भारतातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरही 2 एप्रिलपासून रेसिप्रोकल टॅरिफ लागू केला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.