रस्त्यावर टाकलेली खडी ठरतेय अपघातांना निमंत्रण

संगमनेर (प्रतिनिधी) –संगमनेर शहरातून जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या अकोले बाह्यवळण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यांच्या त्रासामुळे नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आल्याने रस्ता दुरुस्तीसाठी रस्त्याच्या मधोमध खडी टाकण्यात आली आहे. मात्र रस्तातर दुरुस्त झाला नाहीच. पण ही खडीच सध्या अपघातांना निमंत्रण ठरतेय.
अकोले बाह्यवळण रस्ता, अकोले रस्ता ते काशीआई मंदिर, दूधगंगा पतसंस्था ते मारुती मंदिर, पावबाकी रस्ता, हॉटेल राज पॅलेस ते स्वामी समर्थ मंदिर या मार्गावर काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरीकरणाचे केले होते. त्यानंतर या रस्त्यांच्या दुरुस्तीचे कोणतेही ठोस काम गेल्या चार वर्षांत झाले नाही. झाले असल्यास अत्यंत निकृष्ट दर्जाची डागडुजी करण्यात आली. त्यामुळे शहरातील या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी या रस्त्यांवर नागरिकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहे. त्यामुळे नागरिक आधीच त्रस्त होते. पावसाळ्यात त्यात खड्ड्यांची भर पडली.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत तक्रारी केल्यानंतर खड्ड्यांवर उतारा म्हणून थोडा पाऊस कमी झाल्यानंतर खड्डे बुजवण्यासाठी जुनीच शक्कल वापरली. ती म्हणजे खड्ड्यात खडी टाकायची आणि वरून माती ओतायची. जेव्हा दोन-चार खड्डे बुजवायचे असतात, तेव्हा ही उपाययोजना कामी येते. पण संपूर्ण रस्त्यावरच खड्डे असताना मातीची थिगळे लावली की, काय परिस्थिती ओढवेल याचा अनुभव नागरिकांना येत आहे. या कामासाठी अकोले बाह्यवळ रस्त्यावर भरीतकर मळा परिसरात रस्त्याच्या मध्यावर टाकलेले खडीचे ढीग रस्त्यावर पांगत असल्याने मोटारसायकल खडीवरून घसरणे, जड वाहने पक्चर होणे, असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे एकवेळ ते खड्डे चालतील, पण खडी नको, असे म्हणायची वेळ नागरिकांवर ओढवली आहे.





