तेल अविव – अमूल कंपनी इस्त्रायलला अगोदरच तुपाची निर्यात करीत आहे. लवकरच इतर दुग्धोत्पादने इस्रायलला निर्यात करण्याची शक्यता पडताळण्यात येत आहे, असे या कंपनीची पालक कंपनी असलेल्या गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी सांगितले. सध्या पाठविले जात असलेले तूप इस्त्रायलमध्ये राहत असलेल्या भारतीय नागरिकांना पाठविले जात आहे. आता दूध आणि इतर उत्पादने इस्त्रायलच्या सर्व नागरिकांना पाठविण्याच्या शक्यतेवर विचार करण्यात येत आहे असे मेहता यांनी सांगितले. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासह साठ जणांचे सिष्टमंडळ इस्त्रायल भेटीवर आहे. यावेळी विविध क्षेत्रातून इस्त्रायलला निर्यात वाढविण्याच्या शक्यतेवर विचार करण्यात येत आहे. इस्त्रायलमधील नागरिकांना दुधाची उत्पादने पाठविण्यासाठी स्थानिक धार्मिक नियमांचे पालन करावे लागते. त्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश असून इस्त्रायलमध्ये या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. हे तंत्रज्ञान भारतात उपलब्ध करण्यासाठी यावेळी प्रयत्न करण्यात येणार आहेत. इस्त्रायलमधील शेतीचे यांत्रिकीकरण झाले आहे. त्यामुळे कमी क्षेत्रफळावर इस्त्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादन घेतले जाते. केवळ पशुपालन क्षेत्रातच नाही तर इतर क्षेत्रातही इस्त्रायलच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या मर्याद शक्यता आहेत. या शक्यतावर यावेळी विचार करण्यात येणार आहे. यावेळी गोयल यांनी सांगितले की, भारत आणि इस्त्रायल परस्परांच्या विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकतात. यावर विचार करण्यासाठी आपण आलो आहोत.