पुणे – यंदा जेईई मेन्स परीक्षेत उत्तीर्णांचे प्रमाण घटले आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे. निकालाचा कट ऑफ घटला आहे. या परीक्षेत अमरावतीच्या श्रेणिक साकला याने देशात पहिला येण्याचा मान मिळवला. देशातील 24 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत.
जेईई मेन्स परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. पुण्यातील अनेक विद्यार्थ्यांना जेईई ऍडव्हान्ससाठी पात्र ठरण्याची संधी मिळाली. मात्र अनेकांची ही संधी हुकली आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे हे विद्यार्थी जेईई ऍडव्हान्ससाठी पात्र ठरू शकलेले नाहीत, असे संस्थाचालकांचे म्हणणे आहे. जेईई मेन्ससाठी बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या घटल्याने कट ऑफमध्येही घट झाली आहे.
खुल्या गटाचा कट ऑफ मात्र 0.5 पर्सेंटाइलने वाढला आहे. दरम्यान, परीक्षेत पुण्यातील विद्यार्थ्यांची समाधानकारक कामगिरी झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी पहिल्या एक हजार विद्यार्थ्यांमध्ये येण्याचा मान मिळवला आहे.
देशातील पहिल्या तीन हजार विद्यार्थ्यांमध्येही पुण्यातील अनेक विद्यार्थी पात्र ठरले असून, शहरातील सातशे ते आठशे विद्यार्थी जेईई ऍडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत, अशी माहिती आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे संचालक दुर्गेश मंगेशकर यांनी दिली.