महापालिकेने बसवले 7,400 मीटर
पुणे – समान पाणी योजनेअंतर्गत महापालिकेकडून शहरात सुमारे तीन लाख पाणी मीटर बसवण्यात येणार आहेत. सुरूवातीच्या काळात मंदावलेल्या या कामाने वेग घेतला असून गेल्या दोन महिन्यांत शहरात सुमारे 7 हजार 400 मीटर बसवण्यात आले आहेत. या मीटरची मोडतोड होत असल्याने ज्या घराता अथवा व्यावसायिक अस्थापनेच्या नळजोडाला हे मीटर बसवण्यात येत आहेत. त्यांच्याकडून लेखी हमीपत्र घेण्यात येत आहे.
पाणी मीटर बसवण्याचे काम नगर रस्ता परिसरातून जानेवारी 2019मध्ये सुरू करण्यात आले होते. मात्र, निवडणुका असल्याने मीटर बसवण्याबाबत नाराजी पसरल्यास त्याचा फटका बसण्याचा धसका घेत स्थानिक नगरसेवकांनी मीटरला विरोध केला, तसेच ज्या ठिकाणी मीटर बसवण्यात आले, ते मीटर काढून ठेवणे तसेच त्याची मोडतोड करण्याचे प्रकारही घडले. त्यामुळे काही काळ हे काम बंद केले होते, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
मोडतोड रोखण्यासाठी हमीपत्राची मात्रा
मीटरची मोडतोड रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने संबधितांकडून मीटरच्या नुकसानीचे हमीपत्र घेण्यात येत आहे. मोडतोड झाल्यास अथवा मीटर काढून ठेवल्यास संबंधित व्यक्ती, सोसायटी तसेच आस्थापनेला नवीन मीटर बसवण्याचा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे मीटरच्या नुकसानीचे प्रमाण नगण्य झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे मीटर बसवण्याच्या कामाला वेग आला असून वर्षभरात एक लाख मीटर बसवण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.