सोलापूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमाळा (सोलापूर) येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांना अवैध मुरूम उत्खननाविरोधातील कारवाई थांबवण्याचे आदेश दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी अंजना कृष्णा यांच्या शैक्षणिक आणि जात प्रमाणपत्रांच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करत केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (UPSC) चौकशीची मागणी केली होती. मात्र, आता मिटकरी यांनी आपली भूमिका मागे घेत सोशल मीडियावर माफी मागितली आहे. “ही पक्षाची भूमिका नव्हती”, मिटकरी शनिवारी (6 सप्टेंबर) अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली. “सोलापूर घटनेसंदर्भात केलेला ट्वीट मी बिनशर्त मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो. ही माझ्या पक्षाची भूमिका नव्हती, तर माझी वैयक्तिक भूमिका होती. आपल्या पोलीस दलाबद्दल आणि प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे,” असे मिटकरी यांनी म्हटले. नामक प्रकरण काय? 31 ऑगस्ट 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावात अवैध मुरूम उत्खननाविरोधात कारवाईसाठी अंजना कृष्णा आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी स्थानिक राष्ट्रवादी कार्यकर्ता बाबा जगताप याने अजित पवार यांना फोन लावून तो अंजना कृष्णा यांच्या हातात दिला. व्हायरल व्हिडीओनुसार, अंजना कृष्णा यांना सुरुवातीला अजित पवार यांचा आवाज ओळखता आला नाही. त्यांनी पवारांना थेट त्यांच्या अधिकृत क्रमांकावर कॉल करण्यास सांगितले. यावर संतापलेल्या पवारांनी व्हिडीओ कॉलवर कृष्णा यांना, “मी तुझ्यावर अॅक्शन घेईन. इतकी डेअरिंग आहे का तुझी?” असे सुनावले आणि कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. अधिकाऱ्याची नियुक्ती संशयास्पद या घटनेनंतर मिटकरी यांनी अंजना कृष्णा यांच्या UPSC नेमणुकीच्या कागदपत्रांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी पूजा खेडकर प्रकरणाचा उल्लेख करत, अंजना यांच्या शैक्षणिक पात्रता आणि जात प्रमाणपत्रांची चौकशी करावी, अशी मागणी UPSC ला पत्राद्वारे केली होती. “ज्या राज्यात तुमची नियुक्ती झाली, त्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे नाव माहीत नसलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती संशयास्पद आहे,” असे मिटकरी यांनी म्हटले होते. टीकेनंतर मिटकरींचा यू-टर्न मिटकरींच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी तीव्र टीका केली. महिला अधिकाऱ्याला लक्ष्य करण्याचा आरोप करत त्यांनी मिटकरींच्या वक्तव्याचा निषेध केला. यानंतर मिटकरी यांनी आपले ट्वीट मागे घेत माफी मागितली. अजित पवार यांनीही शुक्रवारी (5 सप्टेंबर 2025) स्पष्टीकरण देत सांगितले की, त्यांचा हस्तक्षेपाचा हेतू नव्हता, तर तणावपूर्ण परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न होता.