मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. मात्र, या यादीतून फायरब्रँड नेते आमदार अमोल मिटकरी आणि पुण्यातील नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांची नावे वगळण्यात आल्याने पक्षात एकच खळबळ उडाली आहे. मिटकरी यांनी मात्र यावर सोशल मीडियावर शायरी पोस्ट करून संयमाची भूमिका घेतली आहे, जी सध्या व्हायरल होत आहे. अमोल मिटकरींची शायरी चर्चेत “दुनिया दौडनेवालों की है लेकिन मंजिले सब्र वालों को मिलती है !” या शायरीचा अर्थ – ‘जग हे धावणाऱ्यांचं आहे, पण संयम राखणाऱ्यांनाच मंजिल मिळते.’ यातून मिटकरी यांनी पक्षाच्या निर्णयावर नाराजी दर्शवली नाही, उलट संयमाने वाटचाल सुरू ठेवण्याचा संदेश दिला आहे. ही पोस्ट अवघ्या काही तासांत हजारो लाइक्स आणि रिट्वीट्स मिळवत व्हायरल झाली आहे. दरम्यान, रुपाली ठोंबरे पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “मी लवकरच अजित पवारांची भेट घेऊन याबाबत चर्चा करणार. पक्षाचे काम जोमाने सुरू ठेवणार.” ठोंबरे यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे हा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. नव्या प्रवक्त्यांची नावे? राष्ट्रवादीने नव्या चेहऱ्यांना संधी देताना खालील नेत्यांना प्रवक्तेपदी नियुक्त केले आहे: – अनिल पाटील – रुपाली चाकणकर – ब्रिजमोहन श्रीवास्तव – चेतन तुपे – आनंद परांजपे – सना मलिक – सूरज चव्हाण – विकास पासलकर – हेमलता पाटील – प्रतिभा शिंदे यात सर्वात चर्चेचा विषय ठरला तो सूरज चव्हाण यांचा. छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षाला मारहाण प्रकरणी त्यांचे युवक प्रदेशाध्यक्षपद काढण्यात आले होते. मात्र, आता त्यांनाच पुन्हा प्रदेश प्रवक्तेपदी संधी देण्यात आली आहे. मिटकरी यांची सोशल मीडियावरील आक्रमक शैली आणि भाजपवर केलेली टीका अनेकदा महायुतीसाठी डोकेदुखी ठरली होती. त्यामुळे त्यांना डावलण्यात आल्याची चर्चा आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजी समोर येत असून, उद्धव ठाकरे गटाकडून ठोंबरे पाटील यांना ऑफर मिळाल्याने पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे.