नितेश राणेंनी आपलं हिंदुत्व सिद्ध करावं’; अमोल मिटकरींनी दिले ओपन चॅलेंज

अकोला : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्याचे राजकारण मोठ्या प्रमाणात तापले. विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. शिल्पकार जयदीप आपटेने बनवलेल्या शिवरायांच्या शिल्पाच्या डाव्या भुवईवर खोक दाखवल्याचं ट्वीट अमोल मिटकरींनी केलं होतं. त्यांच्या या ट्विटला नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. अमोल मिटकरीचा धर्म तपासण्याची वेळ आली आहे, अमोल मिटकरी हिंदू धर्मात राहायच्या लायकीचा राहिला नाही, अशी टीका नितेश राणेंनी केली.
अमोल मिटकरींनी दिले ओपन चॅलेंज
नितेश राणेंची लायकी काय आहे हे पोलिसांना माहिती आहे. पोलिसांच्याबाबत अश्लिल बोलणारा व्यक्ती बदलापूर अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हिंदूच आहे, यावर राणेंनी थोबाड का उघडलं नाही? अशी टीका अमोल मिटकरींनी केली.
‘आता तो मला हिंदू धर्म शिकवतोय. माझी त्या राणेंच्या पूत्राला विनंती आहे, त्याने हिंदू धर्मातील चार वेद, सहा शास्त्र आणि 18 पुराणं आहेत त्याची नावं सांगावी आणि आपलं हिंदुत्व सिद्ध करावं’, असं आव्हान मिटकरींनी नितेश राणेंना दिले आहे. आता यावर नितेश यावर काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





