नितेश राणेंच्या टीकेवर अमोल कोल्हेंचा पलटवार, म्हणाले “वडीलांच्या कर्तृत्वावर …”

मुंबई – भाजप आमदार नितेश राणे यांनी वर्धा दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली होती. 2024 मध्ये अमोल कोल्हेंना आपटून टाकू म्हणत. कुठला तो, अमोल कोल्हेंनी दाढी काढली तर त्यांना कोणी ओळखणार नाही, अशी जहरी टीका नितेश राणेंनी केली होती. नितेश राणेंच्या याच टीकेला आज खासदार अमोल कोल्हेंनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी उधळलेल्या मुक्ताफळांचा खासदार अमोल कोल्हे यांनी चांगलाच समाचार घेतला. ज्या व्यक्ती वडिलांच्या कर्तृत्वावर स्वत:च्या अस्तित्वाची पोळी भाजतात त्यांनी बोलताना विचार करावा अशी खरमरीत टीका कोल्हे यांनी केली.
त्यांनी मांडलेल्या गोष्टी ही त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका असेल तरच त्यावर बोलणे उचित आहे, जर पक्ष त्यांच्या वक्तव्याला किंमत देत नसेल तर त्यांच्याविषयी का बोलावं, अशी भूमिका त्यांनी मांडली.
निवडणुकीत कोणाला विजयी करायचे व कोणाचा पराजय करायचा हे जनता ठरवते. त्यामुळे सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनी माझ्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीवर लोकांनी ठेवलेल्या विश्वासाबद्दल भाष्य करू नये, असे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत परंपरा आहे. त्यामुळे चांगल्या गोष्टींचा आदर्श आपण नेहमी घेतला पाहीजे. मात्र क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे, त्यामुळे अशा व्यक्तींवर बोलणे अमोल कोल्हे यांनी टाळले.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/former-home-minister-dilip-valse-patal-criticizes-bjp/
दरम्यान, खासदार कोल्हे यांचा एकेरी उल्लेख करत राणे म्हणाले, “अमोल कोल्हे नावाचा अॅक्टर पैसे घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल करतो तो काही फुकट करत नाही. तो नावासाठी खासदार झाला आहे 2024 ला त्याला आपटून टाकू. त्याने दाढी काढली तर त्याला कोणी ओळखणार पण नाही तो केवळ सिरीयल पुरताच आहे.” असा घणाघात नितेश राणे यांनी एका सभेदरम्यान केला.





