अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय! शरद पवारांना भेटून खासदारकीचा राजीनामा देणार; कारणही सांगितले…वाचा

मुंबई : अजित पवार यांनी बंड पुकारत ९ मंत्र्यांसह शिंदे-भाजप यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अनेक आमदार-खासदार दिसले. त्यात खासदार अमोल कोल्हेंचाही समावेश होता. मात्र, शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी अमोल कोल्हेंनी ट्वीट करत ते शरद पवारांबरोबर असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, आता त्यांनी मोठा निर्णय घेतला असून ते आज आपल्या खासदारकीचा राजीनामा शरद पवारांकडे देणार असल्याचे जाहीर केले आहे.
अमोल कोल्हेंनी आतला आवाज ऐकत शरद पवारांबरोबर असल्याचं जाहीर केले यावेळी त्यांनी शपथविधीच्या हजेरीवरही भूमिका स्पष्ट केली. याविषयी बोलताना, “मी वेगळ्या कामासाठी अजित पवारांकडे गेलो होतो. तेथे गेल्यावर आपल्याला भाजपाबरोबर जावं लागू शकतं असं कानावर घालण्यात आलं होतं. मात्र, लगेच शपथविधी आहे हे माहिती नव्हतं.”असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
“शपथविधी कार्यक्रमाला राजभवनात गेले तेव्हाच मी माझ्या कार्यालयाला माझा राजीनामा तयार ठेवण्यास सांगितलं होतं. कारण मी मतदारांचा विश्वास तोडण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. शिरूर मतदारसंघातील मतदारांनी मला निवडून देताना एका विचारधारेवर विश्वास ठेवला आहे,” असे मत अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.
अमोल कोल्हे आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत. याच भेटीत ते आपल्या खासदारकीचा राजीनामा शरद पवारांकडे सुपुर्त करतील असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. अन्य एका वृत्तावाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत अमोल कोल्हे यांनी, “आधी मला शपथविधी आहे हे माहिती नव्हतं. शपथविधी सुरू झाल्यावर मला राजकारण कोणत्या दिशेने चाललं आहे असा प्रश्न पडला. याचं उत्तरदायित्व, विश्वासार्हता, नैतिकता या सर्व गोष्टींना तिलांजली देणार असू तर मला राजकारणातच राहायचं नाही. त्यापेक्षा मग मी खासदारकीचाच राजीनामा देईन. या राजकारणासाठी मी आलेलोच नाही, अशी माझी सरळ स्वच्छ भावना होती.”





